मुंबई - सिंचन घोटाळ्याची चौकशी मागे लागेल या भीतीने सरकारमधून बाहेर पडत राष्ट्रवादीने राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा केला, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दै. "दिव्य मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीत केला. प्रचार रंगात येत असतानाच चव्हाण यांच्या हल्ल्याने राष्ट्रवादीची पंचाईत होणार आहे.
घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चितळे समितीने पवार व तटकरे यांना क्लीन चिट दिली. पण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्या जनहित याचिकेवर न्यायालयाने दोघांच्या चौकशीचे आदेश दिले. ही फाइल अनेक दिवसांपासून पडली आहे. गृह विभागाने ती पाठवलीच नव्हती. आता निवडणूक काळात ती माझ्याकडे येईल व मंजूर होईल, अशी भीती दोघांना होती, असे चव्हाण म्हणाले.
प्रश्न : सत्तेसाठी नंतर कोणाशी युती कराल?
निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कोणताही मार्ग अवलंबू शकते. ते भाजप, शिवसेनेबरोबर जाऊ शकतात. जातीयवादी शक्तींबरोबर आम्ही जाणार नसल्याने आम्हाला असे पर्याय नाहीत, परंतु राष्ट्रवादी सत्तेसाठी काहीही करू शकते. लोकसभेतील यशानंतर शिवसेना-भाजप युती तुटेल असे आम्हाला वाटले नव्हते. परंतु युती तुटली त्यामागचे खरे कारण समोर यायला पाहिजे.
प्रश्न- एका पक्षाला बहुमत मिळेल असे वाटते?
अन्य पक्षांकडे अनेक छोटे पक्ष जात असले तरी जनता आघाडीच्या सरकारांना कंटाळली आहे. एकाच पक्षाच्या हाती सत्ता देऊ इच्छिते. या वेळी पंचरंगी लढती असल्याने जनता नक्की एकाच पक्षाला निवडून देईल. जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये जे झाले वा राष्ट्रवादीने केले ते जनतेने पाहिले आहे. त्यामुळे अशा संमिश्र सरकारबाबत नाराजीच आहे. जे दिल्लीत झाले ते महाराष्ट्रात होऊ शकते. म्हणजेच एकाच पक्षाच्या हाती जनता सरकार देऊ शकते.
प्रश्न : तुम्ही काही दिवसांत शेकडो फायली क्लिअर केल्याचा आक्षेप आहे?
* यूडी आणि हाउसिंगचा मंत्री मीच असल्याने फाइल दुसरे कोण क्लिअर करणार? पब्लिक पार्किंग पॉलिसीची मी वाट पाहत होतो. ती तयार होताच चुका दुरुस्त केल्या. २६ मजल्यांची पब्लिक पार्किंग पॉलिसी करण्यात आली होती. मी अजित पवार यांना सांगतो की, २६ व्या मजल्यावर जाऊन पार्किंग करा आणि खाली उतरून दाखवा. असे होते का? मी चार मजल्यापर्यंत मंजुरी दिली. त्यात काहीही चूक नाही.
प्रश्न : टोल धोरणही तुम्हाला ठाऊक होते, असे भुजबळ म्हणतात?
* खारघरचा टोल मी दिला का? १५ किमीमध्ये दोन टोल करणे हे कुठले शहाणपण? इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी झाली तेव्हा मी नव्हतो. एकदा कंत्राट दिले की ते थांबवता येत नाही. प्रस्ताव आला तेव्हा त्यांना ठाऊक नव्हते का १५ किमीमध्ये दोन टोल लावता येत नाहीत. चुका करतात आणि मला दुरुस्त करायला सांगतात.
प्रश्न : राष्ट्रपती राजवटीसाठीही राष्ट्रवादीच जबाबदार आहे का?
* राज्यपालांनी मला काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्याचे पत्र दिले आणि काही तासातच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मला काही अधिकार मिळू नये म्हणूनच भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने राज्याला राष्ट्रपती राजवटीखाली ढकलले. याचा फायदा होईल, असे पवार यांना वाटले असावे.
प्रश्न : मोदींनी शरद पवारांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे का?
*तसे होऊ शकणार नाही. मोदी यांनी मंत्रिपद दिले तरी ते प्रफुल्ल पटेल यांना देतील, कारण त्यांचे चांगले संबंध आहेत.
प्रश्न : जाहिरातींमध्ये तुमच्यावर भर आहे?
*जर मुख्यमंत्रिपदासाठी चांगला चेहरा असेल तरच त्या पक्षाच्या उमेदवारांना जनता निवडून देईल. आम्ही अगोदर आघाडीच्या जाहिराती केल्या होत्या, परंतु आघाडी तुटल्यानंतर नव्याने जाहिराती तयार केल्या. त्यात माझा चेहरा वापरावा असे हर्षवर्धन पाटील, नारायण राणे या सगळ्यांनी सुचवले होते.
मी रात्रीच काम करतो
नितीन गडकरी यांनी चव्हाण रात्रीच फाइल क्लिअर करतात असा आरोप केला होता. त्यावर चव्हाण म्हणाले, कॉलेजमध्ये मी रात्रीच अभ्यास करत असे. तेव्हापासूनच मला रात्री काम करण्याची सवय आहे. फाइल वाचून सही करावी लागते. रात्री शांत वेळ मिळतो त्यामुळे मी रात्री काम करतो.