आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amar Singh, Jaya Prada Meet Governor On Sanjay Dutt

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता संजय दत्तसाठी राज्यपालांकडे रांग, जैबुनिसाचे काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अभिनेता संजय दत्तची शिक्षा माफ करावी अशी मागणी करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तसारखीच दोषी ठरवली गेलेली जैबुनिसा या महिलेची शिक्षाही माफ करावी अशी मागणी करणारा एकही सापडत नाही आहे.

समाजवादी पार्टीने निलंबित केलेले अमरसिंह आणि अभिनयातून राजकारणात आलेल्या खासदार जयाप्रदा यांनी सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेऊन संजय दत्तला माफ करावे अशी विनंती केली आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना अमरसिंह यांनी, गेल्या २० वर्षात संजयचा कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभाग होता का, असा सवाल केला. ते म्हणाले, न्यायदानात उशिर होणे हे अन्याय करण्यासारखेच आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करून संजय दत्तला माफ करू शकतात असे सांगत त्यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असेही म्हटले.

संजय दत्तच्या माफीसाठी जोरदार मोहीम सुरू झाली आहे. मात्र, त्याचवेळी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेली जैबुनिसा कादरी या महिलेबद्दल कोणीही बोलायला तयार नाही. जैबुनिसा कादरी यांच्या मुलीने संजय दत्तला माफी आणि माझ्या आईचे काय? असा सवाल उपस्थित केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने मागणी केली आहे की, जर अभिनेता संजय दत्तला माफी मिळत असेल तर, माझी आई देखील माफी योग्य आहे. तिने जैबुनिसा यांच्या माफी बद्दल कोणीही बोलत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी (आर्म्स अ‍ॅक्ट) जैबुनिसा हिच्यावरही खटला दाखल आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने अबू सालेम आणि अनीस इब्राहिम यांच्या सांगण्यावरून एके-56 आणि हँड ग्रेनेड ठेवले होते. तिला देखील या प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्तला देखील बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जैबुनिसावर जे आरोप लावण्यात आले आहेत, त्यापेक्षा संजय दत्तवरील आरोप गंभीर आहेत. तरीही संजय दत्तची शिक्षा माफ व्हावी अशी मागणी जोर धरत आहे आणि जैबुनिसासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नाही.