आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amarsinh Padit Comment On Kelkar Committee Report

विदर्भाला झुकते माप, मराठवाड्यावर अन्याय - अमरसिंह पंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘महाराष्ट्राच्या नावाने विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठीच डॉ. विजय केळकर या समितीची स्थापना झाली होती की काय ? अशी शंका हा अहवाल वाचल्यानंतर येते. कारण या अहवालात विदर्भाला जितके झुकते माप दिले आहे तितक्याच प्रमाणात मराठवाड्याला मात्र डावलले आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मंगळवारी विधान परिषदेत केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेत केली.

डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल राज्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी कुचकामी असल्याचा घणाघात काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनी केला. तसेच राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारू नये अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील अनुशेषांचा केळकर समितीच्या अहवालात अभाव आहे. हा अहवाल राज्याच्या मागास भागातील अनुशेष भरून काढण्यासाठी कुचकामी ठरणारा आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय देण्यासाठी राज्य सरकारनेसुद्धा हा अहवाल स्वीकारू नये. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसारख्या संवेदनशील गोष्टीचा उल्लेखही या अहवालात नाही असा आरोपही माणिकराव ठाकरे यांनी केला. केळकर अहवालावरील उर्वरित चर्चा बुधवारी पुन्हा होणार आहे.

आघाडीवर खापर
दोन्ही सभागृहांत अहवालावर चर्चा करताना मराठवाडा विदर्भातील आमदारांनी आधीच्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला, तर पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी फडणवीस सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या.

अधिकारी गैरहजर
यासंवेदनशील विषयावरील चर्चेवेळी सभागृहात नियोजन विभागाचे एकही उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित नसल्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केला.

विरोधकांचा सभात्याग
संसदीयकार्यमंत्री गिरीश बापट यांनी अधिकारी अनुपस्थितीच्या विरोधकांच्या मुद्याला सहमती दर्शवून संबंधितांना योग्य समज दिली जाईल असे स्पष्ट केले. त्यानंतरही संबंधित अधिकारी सभागृहात आले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.