आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादरच्या आंबेडकर भवनचा आता ‘सोशल मीडिया’वर वाद सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबद येथे गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर दादर येथील आंबेडकर भवनचा वाद नव्याने उभा राहिला आहे. भवनाची व्यवस्था पाहणाऱ्या पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या संचालकांविरोधात सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या ट्रस्टींनी एक प्रसिद्धिपत्रक काढले असून आंबेडकरी जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता आंबेडकरी चळवळीचे केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.   

मागच्या वर्षी जूनमध्ये भवनाचे धोकादायक बांधकाम पालिकेच्या नोटिशीनंतर पाडण्यात आले. त्यानंतर खोटी माहिती सांगत राज्यभर मोर्चे काढण्यात आले. सनदशीर मार्गाने प्रश्न सुटावा म्हणून ट्रस्टींनी हा वाद न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे. याचिका प्रलंबित असतानाही ट्रस्टींविरोधात सोशल मीडियावर पुन्हा बदनामी चालू केल्याचे पीआयटीचे ट्रस्टी श्रीकांत गवारे यांनी सांगितले.   

भवनाची प्रस्तावित सतरा मजली इमारत चळवळीचे हक्काचे ठिकाण पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. यामध्ये सर्व समाजबांधवाना मुक्त प्रवेश असेल. तसेच बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व यंत्रसामग्री या ठिकाणी जतन करण्यात येणार आहे. तरीसुद्धा सत्य परिस्थितीचा विपर्यास करत आंबेडकरी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण करण्यात येत असल्याचे ट्रस्टी एम. एन. कांबळे यांचे म्हणणे आहे.     
मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांचा आंबेडकर भवन धोकादायक बांधकाम पाडण्यात सहभाग नव्हता. तथापि, प्रकल्पाच्या संदर्भात कार्यक्रमात त्यांचा सहभाग सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून होता. गायकवाड यांच्या सहभागामुळे त्यांचा भवनच्या पाडकामाशी आहे, असा गैरसमज समाजात झाल्याचा खुलासा ट्रस्टींनी केला.

भवनाच्या जागेत आंबेडकरी समाजाच्या प्रगतीसाठी चळवळीचे केंद्र उभारण्यासाठी दी पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट मागे हटणार नाही. आंबेडकरी समाजाने कोणत्याही अफवांना बळी पडू नये व बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत असल्याचे ट्रस्टी विजय रणपिसे म्हणाले.

अफवांमुळे तणाव   
आंबेडकर भवनाचे पाडकाम कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच करण्यात आले होते. या ठिकाणच्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची इमारत पाडण्यात आली नाही. प्रेसचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आंबेडकर  भवन बाबासाहेबांचे निवासस्थान नाही, तरीही याविषयी अफवा मुद्दामहून पसरवण्यात येत आहेत.  अफवांमुळे आंबेडकरी समाजात तणाव निर्माण होत असल्याचे ट्रस्टींनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...