आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर स्मारकास पुन्हा ब्रेक; 350 फुटांचा कंपन्यांना धसका, बांधकाम निविदा प्रक्रिया रखडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जमीन हस्तांतरण, भूमिपूजन, आराखड्यातील बदल आदी कारणांमुळे प्रलंबित राहिलेले दादरच्या इंदू मिलमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. आंबेडकरी नेत्यांनी स्मारकाच्या आराखड्यात ऐनवेळी बदल करण्यास सरकारला भाग पाडले. बाबासाहेबांचा ८० फुटांऐवजी ३५० फूट पुतळा उभारण्याचा मागणी पदरात पाडून घेतली. पण, या उंच पुतळ्याचा हट्ट स्मारकाच्या मुळावर उठला अाहे. जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे अाव्हान तेसुद्घा अपुऱ्या किंमतीत स्वीकारण्यास बांधकाम कंपन्या तयार नाहीत. परिणामी स्मारकाची निविदा प्रक्रिया सध्या थंड बस्त्यात गेली आहे.


स्मारकाच्या बांधकामाची निविदा दोनवेळा काढली, मात्र त्याला कंपन्यांच थंडा प्रतिसाद आहे. शापुरजी पालनजी या एकमेव कंपनीने निविदा भरली आहे. प्रभू असोसिएटस या सल्लागार कंपनीने स्मारकाची ६२२ कोटी किंमत काढली आहे. मात्र शापुरजी पालनजी कंपनीने २६ टक्के वाढवून म्हणजे ७८७ कोटीमध्ये कामाची तयारी दाखवली आहे. इतर १२ कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिला खरा. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी निविदा भरल्याच नाहीत. वाढवून भरलेली निविदा सरकार मंजूर करू शकत नाही आणि इतर कंपन्या आहे त्या किंमतीला पुढे येत नाहीत. त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न स्मारकाची जबाबदारी  असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणपुढे आहे. स्मारकाची किंमत वाढवणे किंवा पुतळ्याची उंची कमी करणे असे दोनच पर्याय आता सरकारपुढे आहेत, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

 

अडचण काय?
बारा एकर जागेत दादरसारख्या भागात ३५ मजली उंच पुतळा उभा करणे अशक्यप्राय काम आहे, उभारलेला पुतळा समुद्री वाऱ्यात स्टेबल कसा ठेवायचा हे सुद्धा मोठे कठीण काम आहे. असे तंत्रज्ञान सध्यातरी देशात नाही. उंच पुतळ्याच्या धास्तीने बांधकाम कंपन्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास कचरत आहेत, असेही मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...