आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ; आर्किटेक्ट शशी प्रभूंना दिले 3.44 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छयाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छयाचीत्र
मुंबई- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून विविध घोषणांचा धडाका लावला आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर इंदू मिलमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने केली. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये भूमिपूजनही करण्यात आले. परंतु २३ महिने झाले तरी स्मारकाचे काम पुढे सरकलेले नाही. कामास सुरुवात होत नसल्याने प्रकल्पाचा खर्चही १६६ कोटी रुपयांनी वाढून ४२४ कोटींच्या जागेवर ५९१ कोटी रुपयांवर गेल्याचे एमएमआरडीएने सांगितले. आरटीआय कायद्यांतर्गत एमएमआरडीएकडे इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर स्मारकाच्या कामकाजाबाबत माहिती मागवण्यात आली. माहितीनुसार, स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले आहे. इंदू मिल येथील स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८४१४.८३ चौरस मीटर असून सदर जागेचा ताबा एमएमआरडीएने शासनाच्या वतीने २५ मार्च २०१७ रोजी घेतला आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी १४ एप्रिल २०१७ रोजी रचना व बांधणे या तत्त्वावर निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरू होईल. यासाठी सुमारे ५९१ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येईल. या कामासाठी शासनाने आर्किटेक्ट मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट्स यांची नियुक्ती केली असून त्यांना आतापर्यंत ३.४४ कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. 
 
अनियाेजनामुळे आर्थिक फटका  
एमएमआरडीएने दिलेली माहिती पाहिली असता सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त निवडणूक लक्षात घेऊन भूमिपूजन केले होते. तयारी नसल्यानेच स्मारकाचे काम अजूनही प्रत्यक्षात सुरूच झालेले नाही. कामाला उशीर होत असल्याने प्रकल्पाचा खर्चही १६६ कोटी रुपयांनी वाढला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, सरकारच्या अनियोजनामुळे १६६ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. कामाला आणखी उशीर झाल्यास खर्चात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...