आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांबेडकरांच्या स्वप्नातील चळवळीचे १७ मजली केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दलित समाजबांधवांना सक्षम करून त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी वैचारिक नेतृत्व करणारी संस्था स्थापण्याचे स्वप्नं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६० वर्षांपूर्वी बाळगलं होतं. त्यासाठी त्यांनी दादरला मोठी जागा खरेदी करून दी बॉम्बे शेड्युल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली होती. मात्र, संस्था उभारणीचे बाबासाहेबांचे स्वप्न अधुरेच राहिले. साठ वर्षे हा प्रकल्प रखडला होता. १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ट्रस्टच्या १७ मजली इमारतीची पायाभरणी होणार असून बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या िनमित्ताने हा योग जुळून आल्याने आंबेडकरी चळवळीत आनंदाचे वातावरण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक सभागृहाची कल्पना १९३८ मध्ये मांडली होती. त्यासाठी त्यांनी पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची १४४४ मध्ये स्थापना केली. लोकवर्गणीतून िनधी जमा करून त्यांनी दादर पूर्वला पास्ता लेन येथे १९४६ चौ. मी. जागा खरेदी केली. ३५ हजार रुपये खर्च करून तिथे छोटीशी इमारत बांधली. त्याच इमारतीत बाबासाहेबांची भारतभूषण प्रिटिंग प्रेस होती. पुढे काही वर्षांतच बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले. त्यामुळे या संस्थेचे काम पुढे जाऊ शकले नाही. त्यातच बृहन्मुंबई महापालिकेने ट्रस्टच्या या भूखंडावर १९६७ मध्ये शाळेसाठीचे आरक्षण टाकले. त्यामुळे या भूखंडावर बांधकाम करण्याचा मार्ग बंद झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून सदर भूखंडावरील शाळेचे आरक्षण सामाजिक सभागृहात बदली केले. दादर स्टेशनजवळ उभ्या राहणाऱ्या १७ मजली आंबेडकर भवनात मानवाधिकार प्रशिक्षण आणि कार्यशाळा केंद्र, कायदा सहाय्य आणि कृती केंद्र, दस्तऐवजीकरण केंद्र, आंबेडकरी अर्थशास्त्राचे अभ्यास व संशोधन केंद्र, महिला उन्नती व सक्षमीकरण केंद्र, ग्रंंथालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्य दर्शवणारे थ्री डी संग्रहालय असणार अाहे.
आराखडा तयार : सतरा मजली डाॅ. आंबेडकर भवनाचा आराखडा नुकताच तयार करण्यात आला आहे. इमारत बांधकामाच्या सर्व शासकीय परवानग्याही प्राप्त झाल्या आहेत. भवन साकारण्यासाठी ६० कोटी अंदाजित खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपये मंजूर केले. इतर ५० कोटींचा िनधी समाजबांधवांच्या देणग्यातून उभा केला जाणार आहे.

असा अाहे ट्रस्ट
>बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या ट्रस्टमध्ये आंबेडकर घराण्यातील कोणताही सदस्य ट्रस्टी म्हणून नाही.
>राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड या ट्रस्टचे सल्लागार आहेत.
>मागास घटकांच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलणे, त्यासाठी कायद्यानुसार पुढाकार घेणे आणि बाबासाहेबांनी निर्देशित केलेल्या सामािजक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्थानासाठी समाजकार्य करणे, असे या ट्रस्टचे संकल्प.