आंबेडकर गुरुजींचं कुटुंब / आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी

अशोक अडसूळ

Dec 26,2016 03:00:00 AM IST
मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या ब्राह्मण शिक्षकाने आपले ‘आंबेडकर’ हे आडनाव दिले, त्या कृष्णाजी आंबेडकर गुरुजींची तिसरी पिढी आज कार्यरत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करून आपल्या पणजोबाचा सामाजिकवसा आंबेडकर कुटुंब आजही पुढं नेत आहे. त्याबरोबरच गुरू-शिष्याच्या साताऱ्यातील ‘त्या’ ऐतिहासिक आठवणींचा अनमोल ठेवाही या कुटुंबाने मौखिक पद्धतीने दर पिढीगणिक अभिमानाने जपला आहे.

१८९४ मध्ये सुभेदार रामजी संकपाळ कोकणातून साताऱ्यात स्थायिक झाले. छोट्या भिवाला म्हणजे बाबासाहेबांना त्यांनी कॅम्प स्कूलमध्ये दाखल केले. तेथे कृष्णा केशव आंबेडकर बाबासाहेबांना शिकवत. त्या वेळी कोकणातील लोक गावाची नावे आडनावे म्हणून लावत. बाबासाहेबांच्या गावाचे नाव ‘आंबडवे’ असे अडनिडे होते. हे आडनाव उच्चारायला अवघड, म्हणून गुरुजींनी आपलेच आंबेडकर आडनाव बाबासाहेबांच्या हजेरी बुकात नोंदवले.

कृष्णाजी गुरुजींची आज तिसरी पिढी पुणे, सातारा आणि मुंबईत विखुरली आहे. त्यातील थोरली पाती मुंबईत आहेत. राजीव आंबेडकर आयडीबीआयमधून निवृत्त झाले. अॅड. संजय आणि अॅड. विनायक यांची मुंबईत ‘आंबेडकर असोसिएट्स’ ही लाॅ फर्म आहे. मुंबईतील आंबेडकर कुटुंब दरवर्षी काही आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. महालक्ष्मी ट्रस्टवर अॅड. विनायक आंबेडकर काम करतात. गरजूंना वैद्यकीय मदत निधीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. मुंबई लघुवाद न्यायालयाच्या बार रूममध्ये बाबासाहेबांचे १२ फुटी तैलचित्र अॅड. विनायक आंबेडकरांनी लावले आहे.
गुरुजींचा ठेवा दिला संग्रहालयाला भेट
कृष्णाजी गुरुजी ८५ वर्षे जगले. हयात आंबेडकर कुटुंबातील कुणीही गुरुजींना पाहिलेले नाही; पण त्यांच्या आठवणी मौखिक परंपरेने या कुटुंबानं कायम जिंवत ठेवल्या आहेत. आंबेडकर कुटुंबाकडे कृष्णाजी गुरुजींचा छायाचित्रं आणि पत्रांचा जो ऐतिहासिक ठेवा होता, तो त्यांनी पुण्यातील सिम्बाॅयसिस वस्तुसंग्रहास दान करून टाकला.
बाबासाहेब- गुरुजींची भेट
आजही आंबेडकरांची एक शाखा गुरुजी राहायचे त्या मंगळवार पेठेतील व्यंकटपुरात राहते. बाबासाहेब १९४८ मध्ये मजूर मंत्री झाले. तेव्हा गुरुजींना भेटण्यासाठी साताऱ्याला व्यंकटपुरातील घरी आले होते, अशी आठवण अॅड. विनायक आंबेडकर यांनी ‘िदव्य मराठी’ला सांगितली.

- कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी मूळचे रत्नागिरी जवळील ‘वांद्री’ गावचे. त्यांना पेशव्यांनी ‘आंबेड’ गावाचे वतन दिल्याने त्यांना ‘आंबेडकर’ आडनाव पडले.
- आंबेडकर कुटुंब देवरुखे ब्राह्मण. मिशनरीबरोबर कृष्णाजी गुरुजी काम करत. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल होता.
- चांगदेव खैरमोडे आणि धनंजय कीर लिखित बाबासाहेबांची चरित्रं प्रमाण मानली जातात. पण या ग्रंथांत बाबासाहेबांच्या मूळ गावाचे नाव ‘आंबावडे’ असे छापले आहे. ती माहिती चूक आहे. बाबासाहेबांच्या गावाचे नाव ‘आंबडवे’ होते. त्या वेळच्या रीतीने बाबासाहेबांचे आडनाव ‘आंबडवेकर’ असे झाले असते. म्हणूनच कृष्णाजी गुरुजींनी ते बदलवले.
X