आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅम्ब्युलन्स ऑन कॉल! राहुल गांधींच्या हस्ते उद्घाटन करण्याची कॉँग्रेसची योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महामार्गांवर सुसाट जाणारी वाहने कधी एकमेकांना धडकतात तर कधी पादचारी, दुचाकीस्वारांना उडवून पुढे निघून जातात.. रक्तबंबाळ अवस्थेतील प्रवासी अनेकदा जवळच असलेल्या रुग्णालयात वेळेवर न पोहोचू शकल्याने दगावतो. हे चित्र आता बदलणार आहे. 108 या टोलफ्री क्रमांकावर फोन केल्यास अवघ्या अर्ध्या तासात सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची मदत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ब्लड ऑन कॉल ही योजना यशस्वीपणे राबवल्यानंतर आता राज्य सरकार महिनाअखेरपर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स ऑन कॉल ही योजना सुरू करणार आहे.
महामार्गांवर अपघात झाल्यानंतर वेळेवर रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा आणीबाणीच्या काळात कमीत कमी वेळेत वैद्यकीय सेवा पुरवण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे; परंतु या योजनेची अधिकृत सुरुवात अजूनही झालेली नाही. फेब्रुवारीअखेरीस मुंबईत एका भव्य कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. आरोग्य विभागातर्फे गेल्या वर्षी महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी एक तासात आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी 937 अत्याधुनिक रुग्णवाहिकांची आपत्कालीन प्रतिसाद सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली होती. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुरेश शेट्टी यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही लाभ
या प्रायोगिक योजनेत शहरी भागासाठी दोन आणि एक लाख ग्रामीण लोकसंख्येसाठी एक रुग्णवाहिका देण्यात येईल. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे. यासाठी 93 कोटी खर्च केले जाणार आहेत. पुणे येथील भारत विकास ग्रुप रुग्णवाहिकांचे नियंत्रण करणार असून सध्या रुग्णवाहिकांची कडक चाचणी सुरू आहे. त्यांच्या कठोर निकषांवर रुग्णवाहिका उतराव्यात असा प्रयत्न सुरू असल्याने योजना लागू करण्यास उशीर लागला आहे. मात्र आता ही योजना अंतिम टप्प्यात असून महिनाअखेर त्याचे उद्घाटन करण्यात येईल.
औरंगाबादेत 20 रुग्णवाहिका
औरंगाबादमध्ये 20 रुग्णवाहिका (59 जणांना लाभ), नाशकात 30 (90 जणांना लाभ),अमरावती 18 (92 जणांना लाभ) या सेवेचा प्रारंभ झाला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 497 कॉल आलेले आहेत.
‘क्रांती’पासून वंचित
अपघातग्रस्त, गरोदर महिला आणि गंभीर आजारी रुग्णांसाठी केंद्र शासनाची क्रांती योजना 2006 पासून महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत सुरू आहे. महाराष्ट्रासाठीही निधी देण्यात आला होता, परंतु राज्य सरकार ही योजना सुरू करू शकलेले नाही.
अपघाती बळींची वाढती संख्या
राज्यातील रस्त्यांवर प्रत्येक वर्षी साधारणत: 70 हजार वाहनांचे अपघात होतात आणि त्यात 12 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो, तर 40 ते 45 हजार नागरिक गंभीर जखमी होतात.
सुसज्ज रुग्णवाहिका
या अत्याधुनिक रुग्णवाहिकांमध्ये डीफिब्रिलेटर (हृदयविकाराचा धक्का बसल्यास तातडीने उपचार पोहोचविणारी यंत्रणा) , मॉनिटर, व्हेंटिलेटरसह प्रशिक्षित डॉक्टर आणि वाहनचालक असणार आहेत. या रुग्णवाहिका तीन पाळ्यांत काम करणार असून तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुरू होणार्‍या रुग्णवाहिकांचे नियंत्रण कक्ष पुण्यात असून त्यात पोलिस अणि अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांसह डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका सेवेसाठी 108 हा टोलफ्री क्रमांक तयार करण्यात आला आहे.