आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांकडे महाराष्ट्राचे नव्हे, बिहारचे ‘पालकत्व’! राज्यात येण्याची शक्यता कमीच - तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात महायुतीला भरघोस यश मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास विश्वासू अमित शहा यांना राज्यात पाठवले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, परंतु विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली. महाराष्ट्राऐवजी ते बिहारच्या विधानसभेकडे लक्ष देतील, अशी शक्यता तावडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
राज्यात महायुती अत्यंत मजबूत आहे. शिवसेना-भाजप-रिपाइंसोबत राजू शेट्टी, महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीने चांगले यश मिळवले असून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे, असा दावाही तावडेंनी केला.

राज्यात महायुती सक्षम
‘उत्तर प्रदेशची जबाबदारी मोदी यांनी अमित शहा यांच्यावर सोपवली होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्याने ज्या राज्यात आता निवडणुका होणार आहेत तेथे अमित शहा यांना पाठवले जाण्याची चर्चा आहे. त्यानुसारच त्यांना महाराष्ट्रात पाठवले जाईल, असे सांगितले जाते. परंतु मला त्यात तथ्य वाटत नाही. महाराष्ट्राबरोबरच बिहारच्या निवडणुका आहेत. पक्षासाठी महाराष्ट्रापेक्षा बिहार जास्त महत्त्वपूर्ण असल्याने शहा यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली जाईल. राज्यात आघाडी सरकारला महायुती धारेवर धरणार असल्याने नरेंद्र मोदी थोडे निश्चिंत आहेत. तरीही अमित शहा यांना राज्यात पाठवलेच तर त्यांचे स्वागतच करू,’ असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा यांना पाठविण्यात येणार असल्याच्या चर्चेने सत्ताधारी कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे नेते मात्र कमालीचे धास्तावले होते.