आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: शहा सरांच्या परीक्षेत फडणवीस, दादांना डिस्टिंगशन, पंकजांसह हे बडे मंत्री नापास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तीन दिवसांच्या मुंबई दाैऱ्यावर आलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी फडणवीस सरकारच्या कामगिरीचा शुक्रवारी आढावा घेतला. फडणवीसांसह प्रत्येक मंत्र्याच्या कार्यवृत्तांतावर नजर टाकत शहा यांनी त्यांच्याशी चर्चा करत कामगिरी पडताळून पाहिली.
 
विशेष म्हणजे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्य अहवालाची काॅपी करत बनवलेले कार्यवृत्तांत पाहून शहा नाराज होते. मात्र, येथे येण्यापूर्वीच त्यांनी आपल्या खास यंत्रणेमार्फत मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल मागवून घेतला असल्याने त्यांच्या परीक्षेत शुक्रवारी फडणवीस, चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार हे पास असल्याचे दिसून आले. बाकी विनोद तावडे, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, गिरीश बापट, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावनकुळे  हे यथातथा असल्याचा शेरा शहा यांनी मारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
फडणवीस सरकारला अडीच वर्षे होऊन गेली असताना जनतेच्या मनात या सरकारने कितपत स्थान मिळवले आहे आणि मध्यावधी झाल्यास भाजपला कितपत यश मिळेल, याची चाचपणी शहा यांनी केली. एकनाथ खडसेंसारख्या अनुभवी मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागल्याने भाजप सरकारची धुरा फडणवीस यांच्या खांद्यावर आली होती.
 
फडणवीस १४ तास अथक काम करत आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तसेच अर्थमंत्री मुनगंटीवार हेसुद्धा मेहनतीने काम करत आहेत.  सरकारी तिजोरीची नाजूक अवस्था तसेच महसूल वाढीसाठी करावे लागणारे अथक प्रयत्न याची कसरत मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील करत असल्याची खात्री शहा यांना पटल्याचे कळते.   
 
तावडे, पंकजा, सावरा, महाजन, बापट, बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांकडून भाजपला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, शहा यांच्या अपेक्षांना हे मंत्री खरे उतरलेले नाहीत. याचे कारण म्हणजे कुठल्याही कल्पक योजना या सर्वांना आपल्या खात्यात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करता आलेली नाही. तावडे व बावनकुळे यांनी काही योजना आणल्या खऱ्या; पण त्याचा जनमानसात हवा तसा प्रभाव पडलेला नाही किंवा तसा पाडण्यातही त्यांना यश आलेले नाही, असे शहा यांना चर्चेतून दिसून आल्याचे समजते. आज तुमचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के दिसत असले तरी पुढे ते तसेच असेल असे नाही. भविष्यात काहीही होऊ शकते. यामुळे कामाला लागा, मुख्य म्हणजे लोकांपर्यंत जा, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. पुढे जाऊन तुम्हाला उत्तर द्यावेच लागणार असल्याने आताच या दृष्टीने तयारीला लागलात तर तुमचे भविष्य उज्ज्वल असेल, असे संकेत देण्यास शहा विसरले नाहीत.  
 
मंत्र्यांच्या चर्चेतून तसेच अहवालातून शहा यांनी त्यांच्या कामगिरीची माहिती घेतली असली तरी नंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. या वेळी प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीवर पुन्हा एकदा नजर टाकण्यात आली. गिरीश महाजन, राम शिंदे यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून समाधान व्यक्त झाले असले तरी हे दोन्ही मंत्री फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्याने असे समाधान व्यक्त होणे अपेक्षित होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहा यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. शहा यांच्या बैठकीला घटक पक्षातील नेतेही उपस्थित होते. मात्र, मंत्री सदाभाऊ खोत बैठकीकडे फिरकले नाहीत. तसेच विनायक मेटे  यांनी घटक पक्ष असूनही आम्हाला विश्वासात घेण्यात येत नसल्याची तक्रार शहा यांच्याकडे केली.

बदल अपेक्षित, पण मध्यावधीवर अवलंबून   
गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पक्षविस्तार, शिवार संवाद यात्रेमधून भाजपने मध्यावधी निवडणुकांची चाचपणी केली आहे. चांगला पाऊस व कर्जमाफीचा निर्णय घेऊन मध्यावधीला सामोरे जाण्याचा पक्ष अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनमानसातील अजूनही टिकून असलेली प्रतिमा, भ्रष्टाचारापासून सध्या तरी दूर दिसत असलेली केंद्र तसेच राज्य सरकारे याच्या जोरावर मध्यावधी झाल्यास भाजपला बहुमत मिळू शकते, असे अहवाल हाती आहेत. यदाकदाचित मध्यावधी झाल्यास मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता नाही. दरम्यान, अमित शहा रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, राजू शेट्टींनी नाकारले अमित शाह यांचे चर्चेचे निमंत्रण...
बातम्या आणखी आहेत...