आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या भेटीनंतरही शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात; दानवे- संजय राऊतांना ठेवले चर्चे बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मातोश्री’वर अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
‘मातोश्री’वर अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई - भाजपचे अध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित भेट रविवारी ‘मातोश्री’वर झाली. या वेळी उद्धव यांनी ‘एनडीए’चा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार प्रथम जाहीर करावा, नंतर पाठिंब्याचा निर्णय सांगू, असे शहा यांना सांगितल्याचे समजते.
 
शहा शुक्रवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी सकाळी १० वाजता शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मातोश्रीवर पोहोचले. उद्धव व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.  शहा यांनी उद्धव यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली की, ‘एनडीएमधील बहुतेक घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार निवडीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही या भूमिकेला पाठिंबा द्यावा.’ मात्र त्यावर उद्धव यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला. भागवत यांचे नाव नको असल्यास हरित क्रांतीचे प्रणेते कृषितज्ज्ञ डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावाचा विचार करावा, असे शहा यांना सांगितल्याचे समजते.

बंदद्वार चर्चा : अमित शहा, मुख्यमंत्री आणि उद्धव-आदित्य ठाकरे यांच्यात ७० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. याचा तपशील मात्र मिळू शकला नाही. 
 
भाजपचे निवेदन : दानवे उपस्थित होते...
बैठकीतून रावसाहेब दानवे यांना बाहेर ठेवल्याचे वृत्त लगोलग बाहेर आले आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. याबाबत तर्कवितर्क सुरू असताना पक्षाने दुपारी एक निवेदन प्रसिद्ध करून मातोश्रीवर झालेल्या धोरणात्मक चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे उपस्थित होते, असे स्पष्ट केले.
 
...शहा म्हणाले, तुम्ही बाहेरच थांबा!
शहा मातोश्रीवर आल्यानंतर त्यांचा सत्कार झाला. नंतर अनौपचारिक गप्पा झाल्या. भोजनही पार पडले. या वेळी भाजपकडून अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती, तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य आणि खासदार संजय राऊत होते.  त्यांनतर मुख्य चर्चेला सुरुवात झाली. तत्पूर्वी शहा यांनी ‘आम्हाला महत्त्वाचे बोलायचे आहे. दानवे, तुम्ही बाहेरच थांबा’ असे रावसाहेब दानवे यांना सांगितले. दानवे यांना पक्षाने चर्चेपासून जसे बाहेर ठवले तसेच शिवसेनेने खा. संजय राऊत यांनाही चर्चेपासून दूर ठेवले. 
 
एनडीएच्या उमेदवाराची घोषणा २३ जूनआधी 
नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या एनडीएच्या उमेदवाराची घोषणा २३ जूनआधी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दिली. 

लोजपा नेते रामविलास पासवान यांची भेट घेतल्यानंतर नायडू म्हणाले, एनडीएच्या उमेदवाराबद्दलचा निर्णय आणि नावाची घोषणा २३ जूनआधी केली जाईल. याबाबतीत त्यांनी सपाचे नेते रामगोपाल यादव आणि नरेश अग्रवाल यांच्याशी चर्चा केली आहे. या पदासाठी राजकीय व्यक्तीचीच निवड केली जावी, असा आग्रह सपाने केला. दुसरीकडे अरुण जेटली यांनीही तृणमूल आणि बिजू जनता दलाशीही चर्चा केली आहे. येत्या १७ जुलै रोजी ही निवडणूक होत आहे.
बातम्या आणखी आहेत...