आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात दीड कोटी पक्ष सदस्य नोंदणीचे लक्ष्य- भाजपाध्यक्ष अमित शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळपासून त्यांनी भाजप नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. भाजप सदस्य अभियानांतर्गत महाराष्ट्रातून सव्वा ते दीड कोटी सदस्य नोंदणीचे पक्षाने लक्ष्य ठेवले असल्याची माहिती शहांनी बैठकीनंतर दिली.
पक्षाध्यक्ष अमित शहांनी वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांची बैठक घेतली. त्यात सदस्य नोंदणीसह प्रदेशाध्यक्ष निवडीबाबतही चर्चा झाली. त्यानंतर शहांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाध्यक्ष या नात्याने मोदी सरकारने मागील सहा महिन्यात घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
शहा म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आज सहा महिन्यानंतर महागाईचा दर शून्य टक्क्यांच्या घरात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेल दरात 9 वेळा कपात करण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारकडून देशाच्या विकासाठी धोरणात्मक पावले उचलण्यात येत आहेत. जन-धन योजनेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, स्वच्छ अभियान राबवून सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मोदी सरकारवर जनतेचा विश्वास असून, उद्योग क्षेत्रात नवा उत्साह संचारला आहे. 2019 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाबाबत बोलताना शहा म्हणाले, देशात भाजपचे 10 कोटी सदस्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत अडीच कोटी लोक पक्षाचे सदस्य बनले आहेत. महाराष्ट्रातून वीस लाख लोक सदस्य बनले आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातून सव्वा ते दीड कोटी लोक भाजपचे सदस्य बनलेले असतील.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यामुळे महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नेत्याची वर्णी लावावी यावर शहांनी या बैठकीत नेत्यांची मते जाणून घेतल्याचे समजते. या बैठकीत जालन्याचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. दानवे आजच्या बैठकीला खासकरून उपस्थित होते.