आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: अहवाल तयार करण्यासाठी भाजप मंत्र्यांची धावपळ, अमित शहा घेणार झाडाझडती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबईच्या दाैऱ्यात राज्यातील भाजप मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती घेणार अाहेत. त्यामुळे शहांना ‘पटेल’ असा अहवाल तयार करून घेण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांची गुरुवारी मंत्रालयात एकच धावपळ दिसून आली.
 
शुक्रवारी दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहात अमित शहा हे भाजपचे मंत्री तसेच आमदार व खासदारांचे प्रगतिपुस्तक तपासणार अाहेत. तसेच संबंधितांशी चर्चा करून ते त्यांनी केलेल्या कामांची खात्री करून घेतील. शहा प्रत्येक मंत्री व खासदाराशी ‘वन टू वन’ बैठका घेणार अाहेत. ‘तुम्ही केलेल्या कामाला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळाला’, हेसुद्धा संबंधित मंत्री, खासदारांना शहांना पटवून द्यावे लागणार अाहे. त्यामुळेच अहवालात दिलेली माहिती चाेख असावी, यासाठी प्रत्येक मंत्र्याचे खासगी सचिव तसेच काही अधिकारी अहवाल तयार करण्यासाठी मंत्रालयात धावपळ करताना दिसत होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला कार्यवृत्तांत प्रत्येकाच्या टेबलवर दिसत होता. तुम्ही केलेल्या कामाचा अशा प्रकारचा अहवाल असला पाहिजे, अशा सूचना मिळाल्याने त्यानुसार अहवालावर शेवटचा हात फिरवला जात होता.

अामदारांचीही धावपळ : भाजपच्या आमदारांनाही  अमित शहांसमाेर प्रगतिपुस्तक सादर करायचे अाहे. मागील अडीच वर्षांत मतदारसंघात केलेल्या कामांवर ते अामदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे अापण विधिमंडळात किती प्रश्न उपस्थित केले, किती विषयांवर ते बोलले आणि त्यातील किती प्रश्नांची सोडवणूक झाली आणि किती प्रश्न अर्धवट राहिले, याची सर्व माहिती गोळा करता करता अनेक आमदारांच्या पीएंच्या नाकी नऊ येताना दिसले. दोन दिवसांपासून काही पीएंनी तर रात्र जागून आपल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले असून अनेकांचे रिपोर्ट कार्ड गुरुवारी रात्रीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येते.

मंत्र्यांची पाचावर धारण
अमित शहा केवळ मंत्री व अामदारांचे प्रगतिपुस्तक तपासण्यावरच समाधानी हाेणार नाहीत, तर ‘वर्षा’वर जाऊन ते संबंधितांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार अाहेत. संबंधितांचे काम समाधानकारक आहे की नाही, याची खातरजमाही ते मुख्यमंत्र्यांकडून करून घेतील. अाणि जर एखाद्या मंत्र्याची कामगिरी समाधानकारक वाटत नसेल तर त्यांना ‘डच्चू’ देण्याबाबतही शहा मुख्यमंत्र्यांना अादेश देऊ शकतात, त्यामुळे अनेक मंत्री गर्भगळीत झाल्याचे सांगितले जाते.  

 
बातम्या आणखी आहेत...