मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्या भाजप अध्यक्ष अमित शहांवर ‘अफजल खानाची फाैज’, ‘निझामाचा बाप’ अशी कठाेर शब्दांत टीका केली तेच शहा अाता रविवारी (ता. १८) ‘माताेश्री’वर जाऊन ठाकरेंशी गुफ्तगू करणार अाहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा या उद्देशाने जुने सगळे राग- लाेभ विसरून शहा यांनी शिवसेनेशी तडजाेडीची तयारी दाखवली असल्याचेच यावरून स्पष्ट हाेते.
(शेतकर्यांना कर्जमाफी न दिल्यास राजकीय भूकंप अटळ, शेगावात उद्धव ठाकरेंचा इशारा)
अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५ वर्षांची युती तुटल्यानंतर शिवसेना नेत्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा या भाजपच्या सर्वाेच्च नेत्यांवर अतिशय जहाल भाषेत टीका केली हाेती. भाजपच्या राज्यातील नेत्यांपेक्षा केंद्रातील नेत्यांनाच शिवसेनेशी युती नकाे असल्यामुळेच ही मैत्री तुटल्याचा राग उद्धव ठाकरेंनी वारंवार काढला. मात्र राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पुन्हा दाेन्ही पक्षांनी नमते घेत फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. मात्र केंद्र व राज्यात सत्तेत असूनही माेदी व शहांवर टीका करण्याची एकही संधी ठाकरेंनी साेडलेली नाही. त्यामुळे मोदी आणि शहा प्रचंड नाराज होते. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचेच नाही असा पवित्रा या दोघांनीही घेतला होता. मात्र सध्या राजकीय वारे बदलत असल्याने भाजपने आपला पवित्रा बदलल्याचे दिसून येते. शिवसेनेला न दुखावता सामोपचाराने घ्यायचे आणि पुढच्या निवडणुकीत मात्र त्याचा वचपा काढायचा असे भाजपमधील नेत्यांना वाटत आहे. मात्र अमित शहा यांच्या मनात काय असते ते कोणीही सांगू शकत नाही, असेही भाजपमधील नेत्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेची मदत लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच अमित शहा यांनी तूर्त पडते घेण्याचे ठरवले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. ज्याप्रमाणे पूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटावयास ‘मातोश्री’वर येत त्याच पद्धतीने अापले वजन कायम राखण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत हाेते, गेल्या काही दिवसांत त्याला यश येत असल्याचे दिसत अाहे. जीएसटीच्या निमित्ताने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कर्जमाफीच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी ‘माताेश्री’चे उंबरठे झिजवले. अाता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षच ‘माताेश्री’वर येणार असल्याने शिवसेनेमधून ‘अब अाया उंट पहाड के निचे’ अशा प्रतिक्रिया व्यक्त हाेत अाहेत. यापूर्वीही दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदींसाेबत झालेल्या बैठकीसाठीही शहा यांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रित केले हाेते, ते स्वीकारून ठाकरेंनी माेदींची भेटही घेतली हाेती. अाता शहांसाेबत त्यांची काय चर्चा हाेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.
अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
अमित शहा हे शुक्रवारपासून तीन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून बुथ पातळीच्या पदाधिकाऱ्यांपासून ते प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत ते संवाद करणार आहेत. भाजपाचे जिल्हा राज्य पातळीवरील पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर शहा यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. चर्चगेट येथील गरवारे क्लब येथे भाजपाचे पदाधिकारी. आमदार, खासदार यांच्याशी चर्चा ते चर्चा करतील, राज्यातील घटक पक्षाचे नेते यांच्याबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेणार आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, कलाकार,पत्रकार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. पक्षवाढीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा ते घेणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.