आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते, शहांनी भाजप नेत्यांना पाडले तोंडघशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रातील माेदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप देशभर जल्लाेष साजरा करत असताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विदर्भाबाबतच्या परस्परविराेधी भूमिकेतून मात्र पक्षसंघटनेतील विसंवाद चव्हाट्यावर अाला अाहे. एकीकडे ‘भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते,’ असे शहा सांगत असतानाच दानवेंनी मात्र ‘आमच्या पक्षाने कायम स्वतंत्र विदर्भाची बाजू घेतली आहे. विदर्भवासीयांना आम्ही निराश करणार नाही,’ असे स्पष्ट करत पक्षाध्यक्षांच्याच भूमिकेचे जाहीर खंडन केले अाहे.

मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अायाेजित पत्रकार परिषदेत दानवे यांनी वेगळ्या विर्भाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘भाजप नेहमीच छोट्या राज्यांच्या बाजूने राहिला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड अशी छोट्या राज्यांची निर्मिती केली होती. ती भूमिका अाजही भाजपची अाहे व यापुढेही राहणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीत विदर्भाच्या मुद्द्यावर बाेलताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मात्र ‘आम्ही वेगळ्या विदर्भाचा दावा कधीच केला नव्हता. त्याबद्दल जाहीरनाम्यात उल्लेखही केला नव्हता. एखाद्या नेत्याने तसे अाश्वासन दिले असल्यास त्याचा पक्षाशी संबंध नाही,’ असे सांगत वेगळ्या विदर्भाची मागणी फेटाळून लावली.

वेगळा विदर्भ हे तर आमचे धोरणच!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘दृष्टिपत्र’ नावाने जाहीरनामा सादर केला होता. या वेळी पक्षाचे नेते विनय सहस्रबुद्धे व माधव भंडारी उपस्थित होते. त्यावेळी ‘दृष्टिपत्रात वेगळ्या विदर्भाचा उल्लेख नाही’, असे विचारले असता सहस्रबुद्धे म्हणाले होते, ‘वेगळा विदर्भ कागदावर कशाला. तो तर आमचे धोरण आहे. विकास करायचा असेल तर छोटी राज्य हवीत, असे आमचे सुरुवातीपासून मत आहे अाणि ते आम्ही राबवणार’. अाणि अाता सत्तेवर अाल्यावर मात्र भाजप या अाश्वासनापासून पळ काढत असल्याचा अाराेप विदर्भातून हाेत अाहे. विदर्भवादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत अाहेत.

बारा रुपयांत कफनही येत नाही
एक वर्षात केंद्रातील भाजप सरकारने देशासाठी काय काय केले याची जंत्री दानवे यांनी पत्रकारांसमाेर वाचली. ‘लोकांकडून एकही पैसा न घेता आम्ही पंतप्रधान सुरक्षा विमा योजना दिली,' असे ठासून सांगितले. पण, त्या वेळी ‘१२ रुपयांत कफनही येत नसताना आम्ही दोन लाखांपर्यंत विमा योजना दिली आहे,’ असे उद्गारही त्यांनी काढले.

ही तर काँग्रेस पक्षाची पुण्यतिथी
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. त्याच दिवशी काँग्रेसची पुण्यतिथी झाली होती. त्यामुळे या संपलेल्या पक्षाने भाजपची पुण्यतिथी करण्याची नौटंकी करू नये, असा टोला दानवे यांनी मारला.
बातम्या आणखी आहेत...