आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या सद्य:स्थितीवर अमित ठाकरेंनी व्यंगचित्रातून पहिल्यांदा केले राजकीय भाष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पेजवर पक्षाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे एक व्यंगचित्र काढले आहे. अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय भाष्य केले आहे. “डाऊन बट नॉट आऊट’असे शीर्षक असलेल्या या व्यंगचित्राला मनसे कार्यकर्त्यांनी भरभरून लाईक्स दिले असून, व्यंगचित्रावरील प्रतिक्रियांद्वारे पक्षातील मरगळ झटकण्याची भावनाही अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
  
मनसे सध्या सर्वात कठीण काळातून जात असून पक्षाच्या याच प्रतिकूल परिस्थितीवर अमित ठाकरे यांनी परखड भाष्य केले आहे. आपल्या व्यंगचित्रात अमित यांनी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “जॉन विक’ या हॉलिवूड पटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता कियानो रिव्ह्ज याने जॉन विकची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नायक कशा पद्धतीने आपले ध्येय गाठतो, याची कथा या चित्रपटात साकारली आहे. तशीच काहीशी भावना अमित यांनी मनसेबद्दल आपल्या व्यंगचित्रात व्यक्त केली आहे. 

गेल्या तीन वर्षात मनसेला प्रत्येक निवडणूकीत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पक्षाचे कोणतेही राजकीय भवितव्य दिसत नसल्याने एकाहून एक सरस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशा वेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे कार्यकर्ते अजूनही पक्षात सक्रिय आहेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न अमित यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून केल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचे संकेतही अमित यांनी दिल्याची चर्चाही मनसे कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

राज यांच्याकडे लक्ष
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनाला आता आपला पक्ष पराभव पाहणार नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मनसे नेत्यांनी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी  मेळावा घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राज ठाकरे यांनी हे मेळावे रद्द केले. मात्र, आता राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...