आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'किसान' जाहिरातीसाठी दमडीही घेतली नाही, अमिताभ बच्चन यांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन दिवसांपूर्वी डीडी किसानच्या प्रचारासाठी अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केल्याची बातमी आली होती. यासाठी अमिताभला ६.३१ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचेही म्हटले गेले. परंतु अमिताभ बच्चन यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी याबाबत लेखी खुलासा करीत म्हटले आहे की, डीडी किसानच्या जाहिरातीसाठी मी एक पैसाही घेतलेला नाही तसेच डीडी किसानचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून माझी निवड केल्याची बातमीही चूक आहे. अमिताभने म्हटले आहे की, डीडी किसान वाहिनीच्या जाहिरातींसाठी मी दूरदर्शनशी कोणत्याही प्रकारचा करार केलेला नाही आणि त्याच्या जाहिरातींसाठीही एक पैसाही घेतलेला नाही. लोवे लिंटास या जाहिरात एजन्सीसाठी मी काम करीत आहे त्या एजन्सीकडूनही त्यासाठी काही व्यवहार केलेला नाही.
ब्रँड अॅम्बेसेडरबाबतचा पुरावा द्या
डीडी किसानच्या जाहिराती मी खूप दिवस आधीच केल्या होत्या. मी अनेक गोष्टींबाबत निःस्वार्थीपणे काम करतो आणि डीडी किसान वाहिनीचे काम हे त्यापैकीच एक आहे. वाहिनीने माझी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक केली असेल, तर त्याबाबतचे पुरावे त्यांच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे पाठवावेत, असेही अमिताभ बच्चनने विचारले आहे.

'पंतप्रधान मोदींशी जवळीक, ६ कोटी रुपये घेतल्याचे वृत्त खोटे'
देशातील शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती मिळावी म्हणून केंद्र सरकारतर्फे २६ मे २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीडी किसान वाहिनी उद््घाटन केले. यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता अजय देवगण, काजोल आणि सलमान खान यांची नावे सरकारच्या विचाराधीन होती. मात्र, कोणाशीही बोलणी नक्की न झाल्याने आणि मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक केल्याचे वृत्त आले होते. गुजरातचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम केल्याने तसेच नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्यानेच अमिताभची निवड झाली, असा आरोपही केला जात होता. या वाहिनीसाठी सरकार ४७ कोटी रुपये खर्च करीत असून अमिताभला ६.३१ कोटी रुपये दिल्याचे म्हटले होते. या वृत्तावरून काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली होती.