आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकही पैसा न घेता अमिताभ बच्चन झाला व्याघ्रदूत,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमिताभ बच्चन हे महान कलाकार आहेतच. मात्र, ते केवळ मोठे कलाकारच नाही त तर मोठ्या मनाचेही आहेत. त्यांनी राज्य सरकारचा "व्याघ्रदूत' होण्यास एकही पैसा न स्वीकारता त्वरित होकार देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. सर्वप्रथम ताडोबाला जाणार असून सहाही व्याघ्र प्रकल्पांत अमिताभ यांना घेऊन जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
राज्यातील व्याघ्र वैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित करत वन पर्यटनाला चालना मिळावी म्हणून व्याघ्रदूत व्हावे, अशी विनंती करणारे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना पाठवले होते. बच्चन यांनी सोमवारी होकार देत असल्याचे वनमंत्र्यांना कळवले. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जास्तीत जास्त पर्यटक व्याघ्र प्रकल्पात यावेत यासाठी व्याघ्रदूत व्हावे म्हणून सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांना पत्र पाठवले होते.

अमिताभ बच्चन यांनी दहा दिवसातच होकार कळवून मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मी लवकरच बच्चन यांची भेट घेणार असून त्यांना व्याघ्र प्रकल्प आणि वन्य विभागाबाबत माहिती देऊन याबाबतची पुस्तके देणार आहे. अमिताभ यांना राज्यातील सहाही व्याघ्र प्रकल्पांत घेऊन जाणार असून याची सुरुवात ताडोबापासून करणार आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्प
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
बोर व्याघ्र प्रकल्प

व्याघ्र प्रकल्पात बीग बींचे फोटो लागणार
अमिताभ बच्चन यांनी होकार दिल्याने आता सर्व व्याघ्र प्रकल्पांत त्यांचे फोटो लावून प्रचार केला जाणार आहे. तसेच त्यांच्यासोबत एक चित्रफीतही तयार करून ती सगळीकडे दाखवण्यात येईल. केवळ व्याघ्र प्रकल्पच नव्हे, तर वन्य संवर्धनाबाबतही बच्चन यांचा वापर केला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्ह इन इंडियाच्या २०१४-१५ च्या अभ्यासात मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला ‘व्हेरी गुड’ तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ‘गुड’ असा दर्जा दिलेला आहे.