आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analyses Of Budget Session By Chandrakant Shinde

अधिवेशन विश्लेषण: विरोधक बोथट; सत्ताधारी ताठर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले खरे, परंतु त्यातून विरोधकांचे जे चित्र जनतेसमोर आले ते फारसे सुखावह नाही. अर्थसंकल्पापूर्वी दुष्काळ, मंत्र्यांचे घोटाळे, कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे मनसुबे विरोधकांनी रचले होते, परंतु तसे काहीही झालेले दिसले नाही.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून विरोधक आग्रही होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कर्जमाफी करून बँकांची बॅलन्सशीट वाढवण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपाययोजनांवर भर देऊ इच्छित होते आणि तसेच त्यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे सत्ताधाऱ्यांना ठोकून काढण्याची विरोधकांना मिळालेली आयती संधी होती. परंतु या संधीचा फायदा उचलण्यात विरोधक का अपयशी ठरले आणि सत्ताधारी वरचढ का झाले त्याचा हा लेखा-जोखा...
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : वळसे
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले, विरोधक निष्प्रभ ठरले असे जर तुम्हाला आणि पर्यायाने जनतेला वाटत असेल तर ते आमचे अपयश आहे. खरे तर आम्ही दुष्काळावरून सरकारला चांगलेच जेरीस आणले. परंतु माध्यमांनी त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी दिली नाही. सरकारच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर आम्ही जाब विचारला. परंतु आमच्या प्रश्नांना अत्यंत आक्रमकतेने आवाज चढवून उत्तरे देण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी संयमाने उत्तरे द्यायला हवी होती. सभागृहाच्या कामकाजाबाबत बोलता येत नाही परंतु आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला. आम्हाला बोलू दिले गेले नाही.
माध्यमांकडून दखल नाही : विखे पाटील
काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, विरोधक अधिवेशनात निष्प्रभ झाले असे म्हणणे चुकीचे आहे. सरकारच्या अनेक चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध केला. जनतेच्या भल्यासाठी जे निर्णय आवश्यक आहेत त्याबाबत आवाज उठवला. मराठा, धनगर आरक्षण सरकारने दिले नाही. कापूस शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. आम्ही शांतपणे आमचे म्हणणे मांडले, परंतु माध्यमांनी त्याची दखल घेतली नाही. प्रश्न आणि लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही कायदा सुव्यवस्थेवर चर्चा केली होती. त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्ताव पुन्हा त्याच विषयावर घेण्याऐवजी आम्ही आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारावर घेतला.
सत्ताधारीही आक्रमक : एकनाथ खडसे
विरोधकांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम केले. त्यांच्याकडे विषयच नसल्याने त्यांना सरकारला कोंडीत पकडता आले नाही. आम्ही जनतेच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले, सर्व विषयांचा मुद्देसूद अभ्यास करून सभागृहात गेलो. एखादी व्यक्ती आक्रमक केव्हा होते जेव्हा त्याची नजर स्वच्छ असते. नजरेला नजर मिळवण्याची ताकद असेल. सत्ताधारीही निराधार आरोपांना उत्तर देताना आक्रमक होऊ शकतात. दुसरी गोष्ट, सुनील तटकरेंवर झालेले आरोप. छगन भुजबळांना झालेली अटक याचाही परिणाम विरोधकांवर जाणवला. या गोष्टींमुळे ते बॅकफुटवर गेले. आम्ही स्वच्छ होतो आणि आहोत. आम्हाला बॅकफुटवर जाण्याची गरजच नाही.