आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis About How BJP Government Won Confidence Motion

विश्वासघाताने जिंकलेला ‘विश्वास’, नाही नाही म्हणत पवारांच्या मदतीने राखले ‘सिंहासन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विश्वासमताची आंधळी कोशिंबीर जिंकणा-या भाजपने क्षणिक विजय मिळवला असला, तरी दीर्घ पराभवाच्या दिशेनेच या पक्षाची वाटचाल सुरू झाली आहे. ‘भ्रष्टवादी काँग्रेस' अशा शब्दांंत ऊठसूट राष्ट्रवादीवर टीका करणा-या आणि "पार्टी विथ डिफरन्स'चे ढोल बडवणा-या भाजपने गेल्या २५ वर्षांपासूनची शिवसेनेची मैत्री ताेडत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या राष्ट्रवादीसोबत नवा संसार सुरू करून नवा ‘आदर्श' निर्माण केला.

भाजप आणि राष्ट्रवादी यांची छुपी मैत्री जगजाहीर होती. दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या गाडीत मृतदेह सापडलेल्या योगिता ठाकरे या मुलीचा विषय काढून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली, तेव्हा सभागृहाच्या बाहेर असलेले अजित पवार धावत विधानसभेत आले आणि मलिकांचे बोलणे थांबवून त्यांना सभागृहाबाहेर घेऊन गेले. सभागृहात भाजप-राष्ट्रवादी यांच्या अभद्र युतीचे हे पहिले प्रदर्शन होते. गडकरी त्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हाेते. ते अडचणीत आले तर भाजपही अडचणीत येईल, हे लक्षात घेऊन गृहमंत्रालय सांभाळणा-या राष्ट्रवादीने पोलिसांना या प्रकरणाच्या फार खाेलात न जाण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार मारेक-याचा शोध लागत नसल्याचे कारण देत हे प्रकरण दप्तरी दाखल करण्याची विनंती गृहमंत्रालयाने न्यायालयाकडे केली होती. यानंतर नागपूर, यवतमाळ जिल्हा परिषदांमध्येही राष्ट्रवादी आणि भाजपने सोबत संसार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाचा-भतिजा यांच्या गुलामीपासून मुक्त व्हा’ अशी बारामतीकरांना साद घातली हाेती. ‘एनसीपी’चे वर्णन त्यांनी ‘नॅचरली करप्ट पार्टी' असे केले होते. राष्ट्रवादीच्या घड्याळातील १० वाजून १० मिनिटे झालेल्या चित्राचा हवाला देत गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीने १० पट भ्रष्टाचार केला, असा हल्लाही चढवला होता. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनीही ‘राष्ट्रवादीशी कधीही मैत्री करणार नाही म्हणजे नाही’ असे घसा काेरडा करत सांगितले हाेते. असे असताना माेदींनी भ्रष्ट ठरवलेल्या याच पक्षाच्या मदतीने सत्तारूढ झालेल्या फडणवीस सरकारने भाजप-शिवसेनेला सत्तेत बसण्याचा जनादेश देणा-या मतदारांचा व आपल्या जुन्या िमत्रपक्षाचा विश्वासघातच केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, जुने मित्र बनले शत्रू