आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण - ‘सत्ताप्रेमी’ पवारांकडून दगाबाजीचा धोका कमीच, भाजप सरकार निश्चिंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावेदारी करून विरोधी बाकांवर बसण्याचे संकेत दिले असले तरी आजवर भाजपचे छुपे मित्र असलेले शरद पवार हे आता उघडपणे फडणवीस सरकारच्या मदतीला धावून आल्याने भाजप निश्चिंत आहे. केंद्रात पुढील पाच वर्षे माेदींचेच सरकार राहणार असल्याने राज्यात बाहेरून पाठिंबा देणारे पवार दगाबाजी करण्याचे धाडस करणार नाहीत, अशी खात्री भाजपला आहे. त्यामुळे आता राज्यात राष्ट्रवादी- भाजपचे नवे मैत्री पर्व साकारणार आहे.

एकीकडे विधानभवनात शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावेदारी करीत असताना राष्ट्रवादीच्या मुख्यालयात बसलेल्या पवारांनी भाजपचे सरकार वाचवण्याची जबाबदारी खांद्यावर घेत अशी काही फटकेबाजी केली की काही काळ पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत की भाजपचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पत्रकारांनाही पडला. लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘चड्डीवाल्यांच्या हाती देश देणार का?’ अशी बोचरी टीका करणारे पवार आता त्याच कथित ‘चड्डीवाल्यांच्या’ हाती राज्य सोपवताना आनंदी दिसत होते. तेल लावलेला पहिलवान जसा कुणाच्या कैचीत अडकत नाही तसे पवार सोमवारच्या पत्रकार परिषदेत दिसले. सत्तेत राहण्यासाठी एखाद्या इरसाल राजकारण्याने शब्दांच्या कसरती कशा कराव्यात, याचा मासलेवाईक नमुना म्हणजे त्यांची पत्रकार परिषद होती.

आमचे मत मोजावेच लागेल
शिवसेनेने आजवर भाजपविरुद्ध मतदान करणार, अशी कधीच भूमिका घेतलेली नाही. तसेच सत्तेत सामील होण्याचे दरवाजेही खुले ठेवले आहेत. असे असतानाही पवारांनी स्वत:हूनच पाठिंबा जाहीर करून भविष्यातील नव्या पर्यायांची चाचपणी करण्याचा डाव टाकला आहे. मात्र, आपला पाठिंबा घेतला तर भाजपची अडचण होईल, म्हणून त्यांचा बचाव करायलाही पवारांनी मागे-पुढे पाहिले नाही. ‘आम्ही सरकारच्या बाजूने मतदान केले तर हे मत आम्हाला नको, असे सरकार सांगू शकत नाही. हे मत मोजावेच लागते,' असे पवार म्हणाले.

मुखर्जींना पाठिंबा कसा दिला?
शिवसेनेने यापूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना कसा पाठिंबा दिला, याचे दाखले देत पवारांनी आपला भाजपला पाठिंब्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ‘पाठिंबा पाच वर्षांसाठी आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शिताफीने टाळले.

सरकार टिकवणे हे कौशल्यच
‘सरकार पाच वर्षे टिकेलच, असे मी म्हणत नाही. यापूर्वीही अल्पमतातील सरकारे पाच वर्षे टिकली आहेत. राष्ट्रवादीला स्थिर सरकार हवे आहे, एवढीच आमची भूमिका. सरकार टिकवणे हे त्या सरकारच्या प्रमुखाच्या कौशल्यावर अवलंबून असते. नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यात हे कौशल्य होते, ते सर्वांना सोबत घेऊन चालत,' असे सांगत पवारांनी पाठिंबा हवा असेल तर फडणवीस सरकारला आपली मर्जी सांभाळून राहावे लागेल, हे सूचितही केले. भाजप हा पक्ष जातीयवादी नाही का, या प्रश्नाच्या उत्तरात ‘मी स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा देतोय’, असे वारंवार सांगून पवारांनी वेळ मारून नेली.