आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis About Politics Behind Transfer And Suspension Of Daya Nayak

ANALYSIS : मुख्यमंत्र्यांचे अादेश डावलून दया नायकचेच ‘एन्काउंटर’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे कारण देऊन ‘एन्काउंटर फेम’ पाेलिस उपनिरीक्षक दया नायकला निलंबित करण्यात अाले अाहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेत. विशेष म्हणजे दया नायक यांची मुंबईत नियुक्ती करा, अशी शिफारस खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी नायक यांचा वादग्रस्त पूर्वेतिहास लक्षात घेता त्यांना मुंबईत नियुक्त करून घेतले नाही, उलट नागपूरला बदली केली व तिथे रुजू न झाल्याचे कारण देत सरळ बाहेरचा रस्ता दाखवला, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

दया नायक यांनी एक काळ आपल्या बंदुकीच्या जाेरावर अंडरवर्ल्डची पाळेमुळे खणून काढली हाेती. या धाकाच्या जोरावर त्यांनी पोलिस वर्तुळातही वरचष्मा मिळवला. मात्र, याच काळात अंडरवर्ल्डशी कनेक्शन साधून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले. याच कारणामुळे त्यांना याआधी निलंबित करण्यात आले होते. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केल्यानंतर नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. त्यांची मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागात नियुक्ती झाली खरी, पण नंतर त्यांची बदली नागपूरला करण्यात आली. मात्र, दीड वर्ष उलटले तरी नागपूरला नियुक्तीच्या ठिकाणी ते हजर झाले नव्हते. हे कारण दाखवून त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र, आपल्याला दुसऱ्यांदा सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे पाेलिस महासंचालकांचे आदेश अद्याप मिळालेलेच नाहीत, असा दावा दया नायक यांनी केला आहे.

निवृत्तीच्या अाधी दयाळ यांचे धाडस
धाडसी पाेलिस अधिकारी दया नायक यांची मुंबईतच नियुक्ती करावी, अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी पाेलिस महासंचालक संजयकुमार दयाल यांनी त्याला काेणतीही किंमत दिलेली दिसत नाही. उलट आपल्या अधिकारात नायक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस दयाळ यांनी दाखवले अाहे. यामागचे कारण म्हणजे या निर्णयावरून राज्याचे गृह मंत्रालय सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या खप्पा मर्जी झाली तरी त्याची काळजी करण्याचे दयाळ यांना कारण उरलेले नाही. तसेच त्याचा अापल्या कारकीर्दीवर काही विपरीत परिणाम होईल, अशी भीतीही दयाळ यांना वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे पाेलिस महासंचालकपदावरून निवृत्त होण्यासाठी त्यांचे फक्त दोनच महिने शिल्लक राहिलेले आहेत.

बेहिशेबी करोडोच्या संपत्तीचा अाराेप
सरकारी सेवेत दाखल होण्यापूर्वी फक्त ३ हजार पगार असणारे व एका साध्या हाॅटेलमध्येच राहून दिवस काढणारे दया नायक हे १९९५ मध्ये पोलिस सेवेत दाखल झाले. गुन्हे अन्वेषण विभागात काम करताना त्यांनी पहिल्याच वर्षात छोटा राजन गँगमधील दोघांना यमसदनास पाठवले आणि यानंतर तब्बल ८० पेक्षा जास्त गँगस्टरचा ‘गेम’ केला. नायक यांची ही हुकूमत थेट दुबईपर्यंत होती. नायक दोन रिव्हाॅल्व्हर टेबलवर ठेवूनच काम करत असत. याच काळात करोडाेंची संपत्तीही त्यांच्या नावावर आल्याने संशय निर्माण झाला होता. त्यांच्याच जीवनावर अाधारित ‘अब तक छप्पन’ हा चित्रपटही गाजला हाेता. दिग्दर्शक एन. चंद्रा यांचा ‘कगार’, संजय दत्त अभिनित ‘डिपार्टमेंट’ अादी चित्रपटही दया यांच्यावर अाधारित हाेते.

युती सरकारकडून अाशा
मुंबईबाहेरची बदली रद्द करण्यासाठी नायक यांनी सरकार दरबारी अनेक महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. पण निवडणुकीच्या काळामुळे त्यांची फाइल पुढे सरकू शकली नव्हती. भाजप- शिवसेनेचे सरकार आल्यानंतर नायक यांना आशा वाढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी असल्याने नायक यांना आपली बदली रद्द हाेईल, असेच वाटत हाेते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी नायक यांच्या विनंती अर्जाचा विचार करून त्यांना मुंबईतच नियुक्ती देण्याची शिफारस करणारे पत्र पाेलिस महासंचालकांकडे पाठवले हाेते.

हिशेब चुकता केला !
पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच दोन गट असतात. राजकारणी, व्यावसायिक तसेच गँगस्टरशी असलेल्या कथित संबंधावरून हेवेदावे निर्माण होतात, असे दिसून आले आहे. दया नायक यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप शर्मांचे नेहमीच पाठबळ लाभले होते. शर्माही हे ‘एन्काउंटर फेम’ होते. मात्र, नायक यांनी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून जास्त ‘एन्काउंटर’ केले होते. आपल्या या हुकूमतीचा फायदा उचलत नायक तसेच शर्मा यांनी प्रचंड बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. याचा परिणाम होऊन दोघांनाही पोलिस सेवेतून निलंबित व्हावे लागले होते. शर्मा तसेच नायक यांच्यािवराेधातील गटाने त्यांचा हिशेब चुकता केला असला तरी या दोघांबाबतचा पोलिस अधिकाऱ्यांमधील राग अजूनही शांत झालेला नाही. पोलिस महासंचालकांनी त्यांना निलंबित करण्याचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

का नाकारली नागपूरची बदली?
गेल्या अनेक वर्षांपासून दया नायक हे मुंबईतच कर्तव्यावर अाहेत. या काळात अनेक गँगस्टर टाेळ्यांना अंगावर घेतल्याने त्यांचे अनेक शत्रूही निर्माण झाले अाहेत. मुंबईबाहेर म्हणजेच नागपूरला बदली झाल्यास अापल्या जिवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे, असे कारण देत दया नायक यांनी तिथे रुजू हाेण्यास नकार दिला हाेता.

महासंचालकांनी साधली संधी
मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र दयाळ यांच्या कार्यालयात आले खरे, पण मुख्यमंत्री अमेरिकेला गेले आहेत, ही संधी साधून दयाळ यांनी नायक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे ठरवले. दीड वर्ष झाले तरी नागपूरला बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे कारण देऊन त्यांना तातडीने बाहेरचा रस्ता दाखवण्यात अाला.