आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण : ‘थोरल्या भावा’ला दाखवून दिली जागा! खडसेंनाही ठेवले चार हात दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या २५ वर्षांपासून ‘थोरल्या’ भावाच्या भूमिकेत असलेला मित्रपक्ष शिवसेनेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी आपल्या मुंबईतील पहिल्याच मेळाव्यात मात्र जागा दाखवून दिली. ‘शिवसेनाप्रमुखांचा महाराष्ट्र’ एवढी एकच आठवण सांगत शिवसैनिकांना सुखावणाऱ्या शहा यांनी आपल्या भाषणात ‘भाजपचेच सरकार आणा’ असे अनेकदा ठासून सांगितले.

‘महायुतीत मुख्यमंत्री कोणाचा? भाजपमध्ये दावेदार कोण?’ या प्रश्नावर चर्चा रंगली असतानाच शहा यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या सभेत आपल्या उजव्या हाताला देवेंद्र फडणवीस डाव्या बाजूस विनोद तावडे यांना स्थान देत राज्यातील पक्षांतर्गत नेतृत्वाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून स्वत:हून चर्चेत आलेल्या एकनाथ खडसे या ज्येष्ठ नेत्यास मात्र एक खुर्ची दूर बसविण्यात आल्याने ते स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्याचा संदेश पदािधकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.

शहा यांचे भाषण ऐकण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळेस खरेतर खडसे यांना शाह यांच्या बाजूच्यालाच जागा मिळायला हवी होती. मात्र, उजव्या हातावर बसलेल्या फडणवीस यांच्यानंतरची जागा त्यांना देण्यात आली. शहा यांच्या डाव्या हातावर आशिष शेलार यांना स्थान देण्यात आले. शेलार काही कारणास्तव व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर या जागेवर विनोद तावडे बसले ते कार्यक्रम संपेपर्यंत. उपस्थित नेत्यांचे सत्कार करतानाही खडसेंना प्राधान्य नव्हते. शहा यांच्यानंतर फडणवीस, तावडे एवढेच नव्हे, तर खासदार पूनम महाजन यांच्यानंतर खडसेंचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची दावेदारी करणाऱ्या खडसेंना एक स्पष्ट संदेशच पक्षाध्यक्षांनी दिल्याचे मानले जाते.
नेत्यांवर नव्हे कार्यकर्त्यांवर भर
शहा यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही कानिपचक्या दिल्या. ‘केवळ सभा घेऊन चालणार नाही, यात्रा काढा, लोकांना भेटा’ असे त्यांना सुनवावे लागले. मात्र, भाजपच्या प्रचाराची खरी धुरा कार्यकर्त्यांवर राहील, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे एकीकडे सामान्य कार्यकर्ता सुखावला, तर दुसरीकडे त्यांच्यावर घरोघरी जाण्याची जबाबदारीही आली.
छत्रपती मोदींच्या नावे प्रचार
आजवर शिवसेनेच्या प्रचारात प्रामुख्याने ज्यांचे नाव घेतले जाते त्या शिवाजी महाराज यांचा मुद्दाही शहा यांनी आपल्या भाषणात हायजॅक केला. आगामी निवडणूक शिवरायांच्या नावाला मोदींची जोड देत लढण्याचे स्पष्ट करतानाच मित्रपक्ष शिवसेनेचा एकदाही उल्लेख करण्याचे शहा यांनी टाळले. एकेकाळी भाजप नेत्यांना भेट नाकारणाऱ्या वा ताटकळत ठेवणाऱ्या शिवसेनेवर आज अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी म्हणून मिनतवारी करण्याची वेळ आली. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेनेसोबत युती कायम राहील, असे सांगतानाच शिवसेनेला आता मनमानी करता येणार नाही, असा अप्रत्यक्ष दमच शहा यांनी दिला.

छायाचित्र - भाजपत दाखल झालेले माधवराव किन्हाळकर, बबनराव पाचपुते, भास्करराव खतगावकर आणि उपस्थितांना संबोधीत करताना अमित शहा.