आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण डोंबिवली मनपा : शिवसेनेच्या गाडीला मनसेचे इंजिन लागणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचे शिवसेनेचे स्वप्न भंगले असले तरी भाजप-शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांच्या पक्षीय बलाबलात यंदा माेठी वाढ झाली. तरीही बहुमताचा ६२ हा जादुई अाकडा गाठण्यासाठी या दाेन्ही पक्षांना माेठी कसरत करावी लागेल. त्यासाठी विधानसभेप्रमाणे पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय दाेन्ही पक्षांसमाेर असेल. मात्र केंद्रात व राज्यात भाजपकडून दुय्यम भूमिका मिळत असल्याने दुखावलेली शिवसेना भाजपएेवजी मनसेला जवळ करून महापाैरपदावर दावा करेल, अशी शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात अाहे. शिवसेनेच्या अावाहनाला मनसे कितपत प्रतिसाद देते त्यावर या राजकीय अंदाजाचे गणित अवलंबून अाहे.

२०१० च्या निवडणुकीत १०७ असलेली कल्याण- डाेंबिवली महापालिकेची वाॅर्ड संख्या यंदा लगतच्या २७ गावांच्या समावेशामुळे यंदा १२२ इतकी झाली आहे. यापैकी २ वाॅर्डांत एकही उमेदवार उभा न राहिल्यामुळे १२० जागांसाठी मतदान झाले. भाजप व शिवसेना या सत्ताधारी मित्रपक्षांनी यंदा स्वबळ अाजमावण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार दाेन्ही पक्षांनी अापापली ताकद पणाला लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर नेत्यांनी माेदी, फडणवीस सरकारविराेधात कडक शब्दात टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. त्यामुळे संपूर्ण राज्याची चांगलीच करमणूक झाली. मात्र या अाक्रमक भाषेचा दाेन्ही पक्षांना फायदा झाला. गेल्या वेळी केवळ ९ जागा असलेल्या भाजपच्या पारड्यात मतदारांनी यंदा ४२ जागांचे दान टाकले. तर गेल्या वेळी ३१ जागा मिळवलेल्या शिवसेनेला यंदा ५२ जागा मिळाल्या. मात्र ६२ या बहुमताच्या जादुई अाकड्यापासून दाेन्ही पक्ष दूरच राहिले. अाता सत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला दहा तर भाजपला २० जागांची गरज अाहे.

गेल्या वेळी २७ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या इंजिनाची हवा यंदा मात्र मतदारांनी काढली. त्यांना कशाबशा ९ जागा मिळाल्या. तर कांॅग्रेसच्या जागाही १५ वरून चारवर तर राष्ट्रवादीच्या १४ वरून दाेन वर अाल्या. अाता भाजप- शिवसेनेला एकत्रित येऊन सत्ता मिळविण्याचा हा एक पर्याय अाहे. किंवा मित्रपक्षाला बाजूलाच ठेवण्याची ताठर भूमिका कायम ठेवल्यास भाजपला मनसे व सर्व पक्षांची मदत घ्यावी लागेल. तर शिवसेनेलाही अपक्ष किंवा मनसेची मदत घ्यावी लागेल. यापैकी काेण काेणाच्या गळाला लागताे, याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

एमअायएमचा चंचुप्रवेश एमअायएमने प्रथमच मुस्लिम बहुल क्षेत्रात सात जागांवर अापले उमेदवार उभे केले होते. पहिल्यांदाच मैदानात उतरूनही त्यांची एक महिला उमेदवार विजयी झाली.

महापाैर पराभूत
सर्वात माेठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेच्या विद्यमान महापौर कल्याणी पाटील व शहराध्यक्ष भाऊ चौधरी यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या सुमन निकम यांनी पाटील यांचा केवळ ५० मतांनी पराभव केला. जयेश म्हात्रे व दीपेश म्हात्रे हे दाेन बंधू शिवसेनेकडून विजयी झाले. तर महेश पाटील व त्यांची बहीण सुनीता पाटील या भाजपकडून निवडून अाल्या.

सहा दांपत्य नगरसेवक
विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता, शैलेश धात्रक त्यांची पत्नी मनीषा, विकी तरे आणि त्यांची पत्नी मोना या भाजपकडून विजयी झाल्या. रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांची पत्नी गुलाब, राजेश माेरे व त्यांची पत्नी भारती हे शिवसेनेकडून तर प्रकाश भोईर आणि त्यांची पत्नी सरोज या मनसेकडून विजयी झाल्या.