आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anant Geete: A Shiv Sena Loyalist In Narendra Modi Cabinet

'मातोश्री’चे आज्ञाधारक विद्यार्थी मोदी मंत्रिमंडळात ! अनंत गितेंना कॅबिनेट मंत्रिपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मातोश्री’चा आदेश प्रमाण मानून गिते काम करत आहेत. शिवसेनेच्या ज्या काही मोजक्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंचा विश्वास आहे त्यांपैकी एक म्हणजे गिते होय. याच निष्ठेची त्यांना आज पावती मिळाली.
कुठलाही बडेजाव, आक्रस्ताळेपणा नाही.. अतिशय साधी राहणी आणि ‘मातोश्री’चे अत्यंत आज्ञाधारक विद्यार्थी.. या सर्व बाजू अनंत गिते यांना कॅबिनेट मंत्रिपदाकडे घेऊन गेल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन करणारे गिते हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे पहिले मंत्रिपद मिळवणारे ठरले.

अंधेरी परिसरात हातगाडीवर बटाटा विक्री करणारे गिते तरुण वयापासून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रभावित झाले आणि शिवसेनेसाठी रात्रीचा दिवस करण्यातही त्यांनी कधी मागे पाहिले नाही. 1984 मध्ये ते नगरसेवकही झाले. स्थायी समितीसारखे महत्त्वाचे पदही मिळाले. नगरसेवक झाल्यापासून ‘मातोश्री’शी जुळलेले त्यांचे नाते आजतागायत कायम आहे.
कोकणातील अनेक चाकरमानी पोटापाण्यासाठी मुंबईत येतात. गितेही त्यांचेच प्रतिनिधी. त्यांना कोकणी माणसांची बारकाईने माहिती आहे. कुणबी हा कोकणातील सर्वात मोठा समाज असून स्वत: गितेही याच समाजाचे असल्याने शेतकरी-कष्टकरी समाजाशी नाते लावताना त्यांचा त्यांनी सामाजिक-राजकीय स्थितीसाठी खुबीने वापर करून घेतला. विशेष म्हणजे सहाव्यांदा खासदार होताना त्यांनी राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंचा केलेला पराभवही याची साक्ष देतो. अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत रत्नागिरी-रायगडमधील कुणबी समाज मोठय़ा संख्येने गितेंच्या मागे उभा राहिला.

1996 पासून आजतागायत गिते हे कुठल्याही वादात अडकले नाहीत. सुरेश प्रभूंनंतर केंद्रीय ऊर्जा मंत्रिपद सांभाळणार्‍या गितेंना मागील निवडणुकीपासून रायगडचे प्रतिनिधित्व करावे लागत आहे. आधीच्या मतदारसंघातील फक्त दापोली व गुहागर हेच विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र रायगडमधील नव्याने चार मतदारसंघांचा समावेश झाल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचा त्यांनी 2009 मध्ये पराभव केला. या विजयाने त्यांच्या शब्दाला ‘मातोश्री’वरील वजन आणखी वाढले.