आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या दोन दिग्गज काेकणी नेत्यांत दिलजमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेच्या काेकणातील दाेन दिग्गज नेत्यांमध्ये अनेक वर्षांनंतर दिलजमाई करण्यात रविवारी पक्षातील नेत्यांना यश अाले. केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या मुंबईतील विलेपार्ले येथील कार्यालयाला रविवारी दुपारी अचानकपणे राज्याचे पर्यावरणमंत्री व अाैरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी भेट दिली अन‌् सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अनेक वर्षांपासून या दाेन दिग्गज नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता. मात्र त्यांच्या मनाेमिलनामुळे कोकणातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी येथे होणारा मराठा मूकमाेर्चा या दोन दिग्गजांच्या दिलजमाईसाठी कारणीभूत ठरला.
सध्या राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. लवकरच रत्नागिरी येथेही मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चात शिवसेनेचा प्रभाव दिसावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न अाहेत. रामदास कदमांना मोर्चाच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येण्याचे टाळणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. या कामी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि कोकणाचे संपर्कप्रमुख विजय कदम यांनी मध्यस्थी केली.
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी अनंत गितेंनी प्रयत्न केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला हाेता. इतकेच नव्हे तर तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिते यांच्या प्रचाराकडेही कदम यांनी पाठ फिरवली होती. एवढेच नव्हे तर गितेंच्या विरोधातील अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना कदमांनी छुपी रसद पुरवल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. या सर्व घडामोडींमुळे कोकणातील शिवसैनिक मात्र संभ्रमात होते. मात्र आता या दोन नेत्यांची दिलजमाई पक्षाच्या पथ्यावर पडेल अशी अाशा निर्माण झाली आहे.
कदम पुत्राचे राजकीय भविष्यही तडजोडीचे कारण?
मंत्री रामदास कदम यांचे मोठे पुत्र योगेश यांनी अागामी विधानसभा निवडणुकीसाठी कोकणात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. चिरंजीवाच्या राजकीय प्रवेशासाठी गितेंसारख्या मातब्बर नेत्याची साथ लाभल्यास त्याचा विजय सुकर होईल, असा कदम यांचा होरा आहे. त्यामुळेच जुने मतभेद संपवून मुलाचा राजकीय प्रवेश निर्विघ्न करण्यासाठीच कदमांनी एक पाऊल मागे जात ही तडजोड केल्याची चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...