आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anant Gite Will Resigned After Coming Modi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज बोले अन् उद्धव चाले! मोदी परतताच शिवसेनेचे मंत्री गितेंचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रात असलेली युती तुटल्यानंतर केंद्रात असलेली भाजप-शिवसेना युतीही तुटणार आहे. शिवसेना नेते अनंत गिते केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात गिते अवजड उद्योगमंत्री आहेत. युती तोडून भाजपने अपमान केला तरीही शिवसेनेला केंद्रातील मंत्रिपद सोडवेना, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर रविवारी शिवसेनेने हा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-याहून मायदेशी परतल्यानंतर गिते त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवतील, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार की नाही याबाबत मात्र उद्धव यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. परंतु लवकरच शिवसेना एनडीएमधूनही बाहेर पडण्याची घोषणा करणार असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले. एनडीएमधील शिवसेना हा १८ खासदार असलेला दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा घटक पक्ष आहे.

गिते यांच्या राजीनाम्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेशीही जोडला जात आहे. भाजपने युती तोडून शिवसेनेचा अपमान केला. तरीही शिवसेनेला केंद्रातील मंत्रिपद सोडवेना,अशी टीका राज ठाकरे यांनी रविवारी जाहीर सभेत केली होती. भाजप युती तोडणार हे आधीच मला कळले होते. पण उद्धवला कळले नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपला केव्हाच लाथाडले असते, असे राज म्हणाले होते.

पण गिते म्हणतात...
राजीनाम्याचा प्रश्नच नाही
राजीनामा देण्याबाबत आपणास कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे अनंत गिते यांनी म्हटले आहे. शिवसेनेने एनडीएचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे, माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे गिते म्हणाले.
राज यांची टीका अशी
भाजपने शिवसेनेशी फारकत घेऊन अपमान केला तरीही सत्तेचे सुख उपभोगण्यासाठी शिवसेनेला केंद्रातील मंत्रिपद सोडवेनासे झाले आहे. ‘उत्पन्नाचा स्रोत’ असल्यामुळे महापालिकांमधील युतीही कायम ठेवण्यात आली आहे.

सरकारवर मात्र परिणाम नाही
१८ खासदार असलेली शिवसेना मोदी सरकार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडली तरीही २८६ खासदार असलेल्या एकट्या भाजपकडेच स्पष्ट बहुमत असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

कमी वाट्यामुळे आधीच नाराजी
मोदी मंत्रिमंडळात कमी प्रतिनिधित्व दिल्याने आधीच शिवसेना नाराज होती. १९९९ मध्ये कमी खासदार असूनही वाजपेयी सरकारमध्ये शिवसेनेला ३ मंत्रिपदे मिळाली होती. २००२ मध्ये शिवसेनेला लोकसभा अध्यक्षपदाचीही संधी मिळाली व मनोहर जोशी अध्यक्ष झाले होते.

चार महापालिकांत युतीची सत्ता
जागावाटपावरून बिनसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती तोडली तरीही औरंगाबाद, मुंबई, अकोला, ठाणे या महानगरपालिकांमधील युती अद्यापही कायमच आहे. राज्यपातळीवर युती तुटलेली असताना स्थानिक पातळीवर युती कायम असल्याने शिवसेना आणि भाजप या दोघांवरही टीका केली जात आहे.

गोवा: मगोपशी युती तोडणार!
गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी (मगोप) युती तोडण्याची मागणीही भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत लावून धरण्यात आली. मगोपशी युती तोडणे हा एक पर्याय आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. गोवा विधानसभेत मगोपचे तीन आमदार आहेत.

रिपाइं सोडून अर्जुन डांगळे शिवसेनेसोबत
भाजपला पाठिंबा देण्यावरून रामदास आठवलेंच्या रिपाइंमध्येच फूट पडली. पक्षाचे प्रवक्ते व ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.