आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 950 रु. वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने रविवारी घेतला. येत्या एक एप्रिलपासून अंगणवाडी सेविकांचे मानधन 4,050 वरून 5,000 रुपये, मदतनिसांचे मानधन 2,000 वरून 2,500 रुपये होईल, तर मिनी अंगणवाडी सेविकेला 1,950 ऐवजी 2,400 रुपये मानधन मिळेल.

नव्या निर्णयानुसार, सेविकांच्या मानधनात 950 रुपये, मदतनिसांच्या मानधनात 500 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 450 रुपये वाढ होणार आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार 125 कर्मचार्‍यांना लाभ होईल. मात्र, तिजोरीवर दरमहा 14 कोटी 75 लाख रुपये व वार्षिक 177 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

वस्तीशाळा निमशिक्षक बनणार प्राथमिक शिक्षक : वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ज्या स्वयंसेवकांनी, निमशिक्षकांनी डीएड पूर्ण केले आहे, त्यांना शिक्षकांची वेतनर्शेणी देण्यात येईल. ज्यांनी डीएड पूर्ण केले नाही, त्यांना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांची वेतनर्शेणी मिळेल. यापूर्वीचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.

परीट, धोबी, वैश्य वाणी ‘ओबीसी’त : राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या आणि मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केलेल्या आठपैकी सात शिफारशींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार माच्छी, मिटना, माच्छी-मिटना या जातींचा समावेश विशेष मागास प्रवर्गात करण्यात आला. तसेच सपलिग, गावडा, गावडे, धोबी, परीट, तेलगू मडेलवार (परीट), मडवळ, वट्टी, रजक, नामदेव शिंपी, वैश्यवाणी, वैश्य-वाणी, वै. वाणी, वैश्य वाणी या जातींचा इतर मागासवर्गात समावेश करण्यात आला आहे.

वाहतूक कंत्राटदारांना दरवाढ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वाहतूकदारांना दरवाढीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. परभणी, बुलडाणा, जळगाव, गडचिरोली, औरंगाबाद, बीड तसेच नागपूर या जिल्ह्यांत ही दरवाढ मिळेल.

ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वाढले
‘मनरेगा’तील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. सध्या त्यांना 1000 दिवसांपर्यंत मजुरी खर्चाच्या 2.25 टक्के मानधन देण्यात येते, ते आता 6 टक्के करण्यात येईल. 2000 दिवसांपर्यंत हे मानधन 4 टक्के (सध्या 2.25 टक्के) देण्यात येईल.