आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंना तत्काळ अटक करा- दमानिया, आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या व्हिडिओ प्रकरणानंतर खडसे-दमानिया यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. - Divya Marathi
या व्हिडिओ प्रकरणानंतर खडसे-दमानिया यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत दमानिया यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहून त्यासोबत आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला आहे. गृहमंत्रीही असलेल्या फडणवीस यांनी याची लागलीच दखल घेतली नाही तर आपण न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जाणार आहे. खडसेंनी ज्या भाषेत माझ्यावर व माझी सहकारी प्रीती मेनन यांच्यावर वक्तव्ये केली आहेत ते पाहता मी त्यांना सोडणार नाही असा इशाराही दमानिया यांनी दिला आहे.
 
एकनाथ खडसे आणि अंजली दमानिया यांच्या वादाला सुरुवात 2015 सालीच झाली होती. खडसेंची दोन-तीन प्रकरणे बाहेर काढण्यास अंजली दमानिया कारणीभूत आहेत असा कयास खडसे यांचा आहे. त्यामुळेच फडणवीस मंत्रिमंडळात वजनदार अशी 8-10 खाती संभाळत असलेल्या खडसेंना दीड वर्षापूर्वी राजीनामा द्यावा लागला होता. खरं तर हा वाद भाजपमधील अंतर्गत असल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपमधील काही मंडळी दमानियाला पुढे करून आपल्याला लक्ष्य करत असल्याचा खडसेंच्या मनात सल आहे. त्यामुळेच दलाल, सुपारीबाज महिला व पैसे घेऊन माझी बदनामी करणारी बाई अशी वादग्रस्त वक्तव्ये खडसेंनी केली आहे. 
 
विशेष म्हणजे ही वक्तव्ये ती कधी कार्यकर्त्यांसमोर करतात तर कधी जाहीर छोट्या-मोठ्या सभेत करतात. आपले मंत्रिपद जाण्यास दमानिया जबाबदार आहेत, ही खंत खडसेंच्या मनातून जाता जात नसल्याचे दिसून आले आहे. ताज्या व्हिडिओत तर खडसेंनी दमानिया यांच्याबाबत फारच बेताल व आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. जी सार्वजनिकरित्या सांगताही येणार नाहीत. दरम्यान, त्याचमुळे दमानिया खडसेंवर भडकल्या असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. मात्र, असे होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण या सर्व घडामोडीचा कंगोरा खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलाच माहित आहे.
 
दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत खडसेंबाबत संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली नाही. खडसे कितीही मोठे असले तरी मी त्यांना सोडणार नाही अशी धमकीवजा इशा-याची भाषा त्यांनी आता सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात खडसे-दमानिया वाद राज्यात गाजण्याची शक्यता असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार हे नक्की आहे. 
 
काय आहे खडसे-दमानिया यांच्यातील वाद-
 
जून 2016 मध्ये खडसेंनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्यावर विविध आरोप झाले होते. त्यात दाऊद इब्राहिमबरोबर कथित संभाषण, जावयाच्या लिमोझिन गाडीचे प्रकरण, निळजे (कल्याण) येथील शासकीय जमीन देण्यासाठी खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील याने 30 कोटींची लाच मागितली म्हणून त्याला मंत्रालयात अटक आणि खडसे यांची पत्नी व जावयाकडून भोसरी येथील एमआयडीसीच्या 3 एकर जमिनीची त्रयस्थाकडून खरेदी आदी आरोपांचा समावेश होता. पुण्यातील एमआयडीसी जमीन घोटाळ्याचा मात्र मोठा बोलबाला झाल्यामुळे खडसेंविरुद्धच्या कारवाई करण्यात आली. खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खडसेंविरुद्ध उपोषणाला बसल्या होत्या. अखेर जून 2016 मध्ये खडसेंना मंत्रिपद सोडावे लागले. तेव्हापासून दमानिया-खडसेंत वाकयुद्ध सुरूच आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, या घटनेची पार्श्वभूमी व वाढत चाललेला वाद...
शेवटच्या स्लाईडवर पाहा, दमानियांनी सादर केलेला खडसेंचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...