आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hajare Secretory Meet Home Minister R R Patil

अण्णा हजारेंचे सचिव गृहमंत्र्यांच्या भेटीला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सचिव सुरेश पठारे यांनी बुधवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची मंत्रालयामध्ये भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. साधारण अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दिल्लीत हल्ला झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे राष्टÑवादीचे कार्यकर्ते अण्णांवर चिडलेले आहेत. मात्र आर. आर. पाटील यांनी अण्णांसोबत असलेले आपले मधुर संबंध कायम ठेवल्याचेच आज पठारे यांच्या भेटीतून स्पष्ट होते, असे मत राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने व कॅबिनेट मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
गृहमंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर पठारे यांनी आपण काही खासगी कामासाठी आर. आर. पाटील यांना भेटायला आल्याचे पत्रकारांना सांगितले. राळेगणसिद्धीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत काही चर्चा झाली का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. परुळेकरांबाबत पत्रकारांनी विचारले असता पठारे म्हणाले की, राजू स्वत:च एक विनोद आहेत. त्यांच्यावर काय बोलणार? असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, गृहमंत्र्यांकडून मात्र या भेटीबद्दल काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. पठारे यांच्या नातेवाइकांवर काही महिन्यांपूर्वी अवैध वाळूचा व्यवसाय केल्याचा ठपका होता. कदाचित पठारे त्याच प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांशी चर्चा करायला गेले असण्याची शक्यता असेल, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड म्हणाले की, राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी कदाचित पठारे यांनी आर. आर. पाटलांची भेट घेतली असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.