आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी महाविद्यालये शिक्षणसम्राटांची दुकानदारी - अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील 365 अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी बहुसंख्य महाविद्यालये भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अटींची पूर्तता करत नाहीत. राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय आणि शिक्षण शुल्क समिती याविषयी मूग गिळून गप्प असून शिक्षणसम्राटांच्या महाविद्यालयांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप करत अभियांत्रिकी क्षेत्रातील बेबंदशाहीला वेसण घालण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील 23 महाविद्यालयांवर मान्यतेसंदर्भात कारवाई होत आहे. परंतु, महाविद्यालयांची केवळ मान्यता रद्द करून चालणार नाही, दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अण्णांनी केली.

भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने 2000 मध्ये राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना 2008 सालापर्यंत त्रुटी दूर करण्याचा अवधी दिला होता. परंतु, या महाविद्यालयांनी 2014 मध्येदेखील पुरसे प्राध्यापक नाहीत, पुरेशी जमीन नाही, विद्यार्थ्यांना पुरेशा सोईसुविधा नाहीत. मुंबई विद्यापीठ, तंत्रशिक्षण संचालनालय आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संगनमताने मुंबईत 61 महाविद्यालये विनापरवाना सुरू असल्याचा आरोप हजारे यांनी पत्रात केला आहे.

भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे देशाचे अपरिमित नुकसान : अण्णा
अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील बेबंदशाहीमुळे कॉलेजचे फावत आहे. यात विद्यार्थ्यांची नाहक फसवणूक होत असून भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संगनमतामुळे गुणवत्तेच्या अभियंत्यांना देश मुकत असून देशाचे अपरिमित नुकसान होत असल्याचे हजारे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. गंभीर त्रुटीप्रकरणी राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठांवर राज्य शासनाने कारवाई करायलाच हवी. परंतु, भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) दोषी अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याप्रकरणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

(फोटो - अण्णा हजारे)