आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare\'s Padyatra Start From 25 March Towords To Delhi

भू-संपादन: मोदीविरोधात अण्णांचा \'लाँन्ग मार्च\'; वर्धा- दिल्ली पदयात्रा 30 मार्चपासून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा- भूसंपादन विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसाठी वर्ध्यातील सेवाग्रामधील गांधी आश्रम ते दिल्ली अशी पदयात्रा येत्या 30 मार्चपासून काढण्यात येणार आहे. भूसंपादन विधेयकाविरोधात पदयात्रा काढण्यासाठी व त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली आज वर्धा येथे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत पदयात्रेचा मार्ग, तारखा, वेळा आदी रूपरेषा ठरविण्यात आली. त्यानुसार, 23 मार्चला शहीद भगतसिंग यांच्या पंजाबमधील स्मारकाचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात होईल तर 30 मार्चपासून ही पदयात्रा वर्ध्यातून दिल्लीकडे कूच करेल. सुमारे महिनाभर ही पदयात्रा 2100 किमीचे अंतर व सहा-सात राज्यात प्रवास करीत 27 एप्रिलपर्यंत ही पदयात्रा दिल्लीत पोहचेल. दरम्यान, या बैठकीला आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार आणू पाहत असलेल्या भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच नाही. भूसंपादन करताना नागरिक आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचीही सरकारची इच्छा नाही. विधेयकात शेतकरीविरोधी काही असेल तर ते काढून टाकू असे मोदी फक्त म्हणतात. पण करत काहीच नाही. आता आम्हाला सुधारणा नको, तर हे विधेयकच मागे घेण्यात यावे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. विधेयकातील शेतकरीविरोधी भाग काढून टाकू, असे मोदी म्हणत आहेत. हा भाग त्यांनी पूर्वीच का काढला नाही असा सवाल अण्णांनी केला.
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून डच्चू देण्यात आलेले नेते योगेंद्र यादव यांनी अण्णांसोबतच्या आजच्या बैठकीला हजेरी लावली. आता आरोप-प्रत्यारोप आता नको, बस झाले. पक्षाच्या धोरणावर, पक्षावर विश्वास ठेवूया, आशा सोडू नका व कामाला लागूया असे सांगत यादव यांनी पक्षांतर्गत भांडणाचा शेवट करावा अशी इच्छा व्यक्त केली. भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच भू-संपादन विधेयकावरून मोदी सरकारशी दोन हात करायला सज्ज व्हा असे आवाहनही यादव यांनी आपच्या कार्यकर्त्यांना केले.
भाजपशासित राज्यातून पदयात्रा काढणार- अण्णा हजारे यांनी सुमारे महिनाभर देशाच्या विविध भागातून पदयात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. वर्धा ते दिल्ली हा प्रवास बहुतेक भाजपशासित राज्यातून होणार आहेत. महाराष्ट्रातून ही पदयात्रा पुढे गुजरातचा काही भाग घेऊन मध्यप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, यूपी, हरयाणा आदी राज्याला गवसणी घालून 27 एप्रिलच्या दरम्यान दिल्लीत पोहचणार आहे. यातील युपी हे राज्य वगळले तर सर्व ठिकाणी भाजपची सरकारे आहेत. ही पदयात्रा सुमारे 1100 किमी लांबीची असेल. यादरम्यान हे विधेयक शेतकरीविरोधी कसे आहे याबाबत माहिती दिली जाईल. पोस्टर, पथनाट्ये आदी कलात्मक पद्धतीने या विधेयकाविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील शेतक-यांतच भूसंपादन विधेयकाबाबत जनजागृती करण्याचा मनोदय अण्णांनी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.