मुंबई- मुंबईत आणखी एका नौदलाच्या जहाजाला अपघात झाला. आयएनएस कोलकाता या युद्धनौकेत गॅस गळतीमुळे स्फोट होऊन एका नौदल अधिका-याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील माझगाव डॉक (गोदी) येथे घडली आहे.
यात दोन अधिकारी बेशुद्ध पडून जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. आयएनएस कोलकाता ही आधुनिक युद्धनौका आहे. याबाबत सांगितले जात आहे की, युद्धनौकेवर ट्रायलचे काम सुरु आहे. तसेच छोट्या-छोट्या दुरुस्तीचेही काम सुरु होते. मात्र अग्निशमन यंत्रणेच्या दुरुस्तीदरम्यान सिलेंडरमधून कार्बन डॉयऑक्साइड बाहेर आला. त्यामुळे स्फोट झाला व घटना घडली.
मागील आठवड्यात मुंबईच्या किनारपट्टीपासून 50 किलोमीटर आत समुद्रात आयएनएस सिंधुरत्नला आग लागून दोन नौदल अधिका-यांचा मृत्यू झाला होता. तसेच 7 जण गंभीर जखमी झाले होते.