आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Modi & Jnanpith Awardee U R Anantha Murthy Dead

मोदीविरोधक कन्नड साहित्यिक अनंतमूर्तींचे निधन, मुख्यमंत्री चव्हाणांना दु:ख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यु. आर. अनंतमूर्ती)
बंगळुरू- ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यु. आर. अनंतमूर्ती यांचे आज दुपारी 3 वाजता वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. मागील दहा दिवसापासून ते रूग्णालयात दाखल होते. त्यांच्या शरीरात संसर्ग झाल्याने त्यांना लाईफसपोर्टवर ठेवण्यात आले होते. अखेर आज दुपारी डॉक्टरांनी अनंतमूर्तींचे निधन झाल्याचे घोषित केले. मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन अशी धमकी दिल्याने ते देशात चर्चेत आले होते.
मोदींना केला होता विरोध- भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जेव्हा घोषित केले तेव्हा अनंतमूर्तींनी मोदींवर सातत्याने टीका केली होती. मोदी पंतप्रधान झाल्यास देशातल्या लोकांना हुकुमशाही झेलावी लागेल. मोदी पंतप्रधान झाल्यास ते लोकांच्या मनात भय निर्माण करतील. त्यामुळे असा भीतीदायक व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खूर्चीत बसणे देशासाठी योग्य ठरणार नाही. देशाला एका अशा व्यक्तीची गरज आहे जो देशात भयमुक्त वातावरण आणि योग्य सरकार निर्माण करेल. मात्र, तरीही जर मोदी पंतप्रधान झाल्यास आपण देश सोडून जावू असेही थोर लेखकांत गणना होणा-या अनंतमूर्ती यांनी म्हटले होते. मात्र, लोकसभेत भाजपचा व मोदींचा ज्या पद्धतीने विजय झाला त्यानंतर मात्र त्यांनी मोदींवर टीका करणे सोडून दिले होते.
अनंतमूर्ती हे मानवी जीवनसंघर्षाचे यथार्थ दर्शन घडविणारे सिद्धहस्त लेखक- मुख्यमंत्री
'ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यु. आर. अनंतमूर्ती यांनी आपल्या साहित्यामधुन सामाजिक-आर्थिक स्थित्यंतरावर नेमके भाष्य केले. आपल्या साहित्यकृतींमधुन मानवी भावभावना, सुखदु:खे, मूल्ये आणि जीवनसंघर्ष याचे यथार्थ दर्शन वाचकाला घडविण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगभरात पोचलेल्या एका सिद्धहस्त लेखकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात चव्हाण यांनी म्हटले आहे की, यु. आर. अनंतमूर्ती यांच्या कित्येक साहित्यकृतींचे मराठीसह अनेक जागतिक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ज्ञानपीठसह पद्मभूषण, दि हिंदू साहित्य पुरस्कार अशा नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. कोलकाता विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला होता. युरोपामधील अनेक देश, चीन, रशिया अशा देशांमध्ये त्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळांमधुन भेटी देऊन आपल्या वक्तृत्वाने तेथील जनमानसाला प्रभावित केले. लघुकथा, नाटक, कादंबरी, कविता, समीक्षा अशा साहित्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींवर चित्रपटांचीही निर्मिती करण्यात आली आहे. त्यांच्या राजकीय व वैचारिक भुमिकेने अनेकदा वादही निर्माण केले. परंतु, आपल्या मताशी ते ठाम राहिले.