आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Antulay Dares Congress, Supports Opposition Nominee In Raigad

ए. आर. अंतुलेंचे राज ठाकरेंशी संधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘काँग्रेसने हवी ती कारवाई करावी, मी त्याला घाबरत नाही,’ असे थेट आव्हान देत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी बंडाचे निशाण उभारत शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. यामुळे रायगड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे मात्र अडचणीत आले आहेत.

मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मंगळवारी अंतुले यांची भेट घेतली. या वेळी शेकापचे आमदार जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतर अंतुलेंनी आपली खदखद माध्यमांसमोर बोलून दाखवली. रायगड मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्याने संतापलेल्या अंतुले यांनीही दोनच दिवसांपूर्वी शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्याबाबत आभार मानण्यासाठी मनसे आमदारांनी ही भेट घेतल्याची माहिती अंतुले यांनी दिली. आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याचे अंतुले म्हणाले.

अंतुले यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर व शेकापचे उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कॉँग्रेसने त्यांच्याविरोधात अहवाल केंद्रीय नेतृत्वाला पाठवला आहे. त्याबाबत अंतुले म्हणाले की, मी कारवाईला घाबरत नाही. तटकरेंना मीच राजकारणात आणले, पण ते जिल्ह्याच्या राजकारणाला काळिमा फासत आहेत. म्हणूनच आता तटकरेंचेही ‘दफन’ करणे गरजेचे आहे.’

बालेकिल्ला रायगड ही आता काँग्रेसची दफनभूमी : अंतुले
एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायगड मतदारसंघ यंदा राष्ट्रवादी कॉँग्रेसला देताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला साधी विचारणाही केली नाही. या जिल्ह्याचा काही भाग हा रायगड मतदारसंघात, तर उर्वरित भाग हा मावळ मतदारसंघात येतो. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असल्याने रायगड जिल्ह्यात आता काँग्रेसचे अस्तित्व कसे टिकणार? आता रायगड ही काँग्रेसची दफनभूमी झाल्याची परखड टीकाही अंतुलेंनी केली. भाजपमधील ज्येष्ठांपेक्षा काँग्रेसमधल्या ज्येष्ठांची वाईट अवस्था आहे, असे सांगत त्यांनी ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच कॉँग्रेसची भूमिका असल्याचे सांगितले.