आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आदर्श' घोटाळाः शिंदे, विलासरावांची भूमिका स्‍पष्‍ट करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) द्यावेत, अशी विनंती करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात दाखल केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 आॅगस्ट रोजी आहे.
सीबीआयच्या तपासावर न्यायालयाने लक्ष ठेवावे, या मागणीसाठी मागील वर्षी वाटेगावकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. सध्या न्यायमूर्ती शरद बोबडे व न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. देशमुख यांनी आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी करणाºया जयपाल पाटील आयोगासमोर 26 व 27 जानेवारी रोजी साक्ष दिली होती. त्यात आदर्श सोसायटीसमोरील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी केली नसती, तर सोसायटीची जागा अस्तित्वात आली नसती, अशा आशयाचे विधान केले होते. देशमुख यांच्याकडे तेव्हा मुख्यमंत्रीपद व नगरविकास खात्याचा कार्यभार होता. त्यांच्यासारख्या जनतेच्या सेवकाने ‘आदर्श’सारख्या खासगी संस्थेसाठी रस्त्याची रुंदी कमी करणे, हे जनहिताविरुद्ध आहे. तसेच, सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांचे नाव येण्याची शक्यता असल्याचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. परंतु, 4 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात देशमुख यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. माजी मुख्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्या साक्षीतून देशमुख यांच्या या प्रकरणाशी असलेल्या संबंधांना पुष्टीच मिळते. या सर्व प्र्रकरणावरून देशमुख जनहिताऐवजी आदर्श सोसायटीच्या खासगी हितसंबंधांशी निगडित होते हे दिसते. त्यामुळे सीबीआयने यासंदर्भात केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती वाटेगावकर यांनी आपल्या अर्जात केली आहे.

आव्हाड, निलंगेकरांवरही ठपका
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सोसायटीत फ्लॅट खरेदीसाठीचे पैसे आपल्या जितनात इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून घेतले होते. त्यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा 2012मध्ये राजीनामा दिला. आव्हाड यांच्याविरोधात आपण 19 डिसेंबर 2011 रोजी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानंतरच फौजदारी गुन्ह्यातून पळ काढता यावा, या हेतूनेच त्यांनी राजीनामा दिल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला आहे. आव्हाड यांच्या विरोधातील तपासाचा अहवालही सीबीआयने सादर करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. शिंदे यांच्यासह माजी महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी. के. शंकरन, सनदी अधिकारी जॉयस शंकरन, चिंतामणी संगीतराव, आय. ए. कुंदन, देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात आदर्श सोसायटी घोटाळ्यासंदर्भात केलेल्या तपासाचा अहवालही सीबीआयने सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती वाटेगावकर यांनी न्यायालयाला केली आहे.