मुंबई - ‘आम्हाला देशद्रोही, विभाजनवादी म्हणणा-या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी
आपल्या वक्तव्याबाबत बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर न्यायालयात अवमान केल्याचा खटला दाखल करू,’ असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रणिती यांना गुरुवारी दिला.
काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे एका कार्यक्रमात प्रणिती यांनी ‘एमआयएम’वर टीकेची झोड उठवली होती. त्याला प्रत्त्युत्तर देताना ओवेसी म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांनी सोलापूर मध्य मतदारसंघातून तुल्यबळ लढत दिली. प्रणिती केवळ नऊ हजार मतांनी निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी एमआयएमचा धसका घेतला आहे. जर आम्ही देशद्राही आहोत, तर प्रणिती आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का दाखल करत नाहीत?
दोषी आढळल्यास आमच्यावर कारवाई होईलच. मात्र, प्रणिती यांनी केवळ नैराश्यातून हे वक्तव्य केले आहे. सोलापूर हे भारतातच आहे. शिंदे यांनी या शहराला आपली संपत्ती समजू नये,’ असेही ओवेसी यांनी ठणकावले.
काय म्हणाल्या होत्या प्रणिती?
‘एमआयएम हा देशद्रोही विचार असलेल्या लोकांचा पक्ष आहे. मी केवळ एका विशिष्ट समाजाबद्दल बोलत नाही. ओवेसी यांनी केवळ सोलापूरच नव्हे, तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक जागी भडक वक्तव्ये करून देश तोडण्याचे काम केले आहे,’ अशी टीका प्रणिती यांनी केली होती.
आधी टीका नंतर कोलांटउडी
गुरुवारी ओवेसी यांच्या इशा-यानंतर प्रणिती म्हणाल्या "एमआयएम ही देशद्रोही संघटना आहे,' असे वक्तव्य केलेले नाही. माझे वक्तव्य देशात तणाव निर्माण करणा-या व देशद्रोही कृत्य करणा-यांबद्दल होते. मी कोण्या एका पक्षाबद्दल असे बोललेले नाही. जे धर्मनिरपेक्षतेला छेद देऊ इच्छितात व देशात जातीय तणाव निर्माण करतात, त्यांच्याबद्दल मी बोलले होते,' अशी सारवासारव त्यांनी केली.
तेव्हा आम्ही देशद्रोही वाटलो नाही?
काँग्रेस सरकार अडचणीत असताना या पक्षाचे नेते आमच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना आमची भाषा देशद्रोहाची वाटली नाही किंवा आमच्या संघटनेमध्ये काही गैरही जाणवले नाही; पण आता मात्र ते आम्हाला देशद्रोही म्हणून कारवाईची मागणी करत आहेत, असा टोलाही खासदार ओवेसी यांनी शिंदे यांना लगावला. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ पक्षाने काँग्रेसच्या व्होटबँकेला धक्का देत दोन आमदार निवडूण आणले आहेत. सोलापूर मध्य मतदारसंघातही या पक्षाने प्रणिती शिंदे यांनी चांगलेच झुंजवले होते.