आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी ग्रुप नरेंद्र मोदींनी पोसला :आप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मी कॉमन माणूस आहे. मी भ्रष्टाचार करत नाही. कोणाला करू देत नाही, असा जप गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सतत करत असतात. मग, त्यांच्या गुजरातमध्ये अदानी ग्रुपचे साम्राज्य कोणाच्या जिवावर उभे राहिले, अदानी ग्रुपला कवडीमोल भावाने हजारो एकर जमिनी कोणी दिल्या, असा खडा सवाल आपचे मार्गदर्शक योगेंद्र यादव यांनी केला.
आम आदमी पार्टीने बुधवारी मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी योगेंद्र यादव यांच्यासह ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, विजय पांढरे, अंजली दमानिया आदी उपस्थित होते. अदानी ग्रुपला मोदी यांनी गुजरातमध्ये 30 पैसे मीटरवर हजारो एकर जमीन दिली. त्याच मोदी प्रशासनाने भारतीय नौदलाला आणि कारगिल विधवांना मात्र बाजारभावाने भूखंड घेण्याची सक्ती केल्याचा आरोप यादव यांनी केला. देशात कॉमनवेल्थ घोटाळा, कोळसा खाणवाटप, टूजी भ्रष्टाचार आणि आदर्श घडत असताना आपण काय करत होता, असा सवालही त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून विचारला.
40 हजार कोटींचा महसूल देणार्‍या मुंबईकरांना मूलभूत सुविधा देण्यास शासन अपयशी झाल्याचा आरोप या वेळी मेधा पाटकर यांनी केला. सिंचनाच्या निधीतील 50 टक्के निधी मंत्री, अधिकारी आणि दलाल यांच्या खिशात जात असल्याचा आरोप नाशिक लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार विजय पांढरे यांनी केला. मुंबईतील एसआरए योजना केवळ बिल्डरांसाठी राबवण्यात येत असल्याचा आरोप उत्तर पूर्वचे उमेदवार मयंक गांधी यांनी केला.
भाजपच्या बँक खात्यात 900 कोटी रुपये जमा असून त्यामध्ये तीन लोकसभा निवडणुका लढवता येऊ शकतात, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. अंधेरी येथे झालेल्या या सभेला आपचे राज्यातील 6 लोकसभा उमेदवार उपस्थित होते. लोकसभा प्रचाराचा शुभारंभ या सभेने करण्यात आला. सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
राष्‍ट्रवादीवर हल्ला
राष्‍ट्रवादी पार्टी गावगुंडांची पार्टी असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. तर राष्‍ट्रवादी काँग्रेस राष्‍ट्रविरोधी काँग्रेस आहे, असे योगेंद्र यादव म्हणाले.
अंबांनीची खिल्ली
मुंबईतील मुकेश अंबानी यांचे 28 मजली घर, कृष्णा गोदावरी गॅस प्रकल्पातील बनवेगिरी यावरुन रिलायन्सवर सर्वच वक्त्यांनी हल्ला चढवला. श्रोत्यांमधून त्यास मोठी दाद मिळत होती.