आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Appoint Doctors, If Not Face Disrespect Notice High Court

डॉक्टरांची नेमणूक करा, अन्यथा सरकारला अवमान नोटीस काढू - उच्च न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकार स्वत:चे काम आपणहून का करत नाही ? न्यायालयाला आदेश का द्यावे लागतात ? जर मेळघाटात दोन आठवड्यांत डॉक्टरांची नियुक्ती केली नाही, तर आरोग्य, आदिवासी विकासे विभागांविरोधात अवमानाची नोटीस काढण्यात येईल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कुपोषण निर्मूलनाबाबत उदासीन भूमिका घेणा-या राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.


मेळघाटातील कुपोषणाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वी वारंवार आदेश देऊनही मेळघाटात महिला रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या परिसरातील महिलांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. यामुळे संतापलेल्या न्यायालयाने नोकरशाहीचीही खरडपट्टी काढली.


मेळघाटातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी नोकरशाहीची इच्छा नाही. दुर्गम भागात सेवा करण्यासाठी तरुण डॉक्टरांकडून बाँड लिहून घेतला जातो. त्यांच्या शिक्षणासाठी सरकार लाखो रुपये खर्च करते. अशा डॉक्टरांना तुम्ही मेळघाटात पाठवा. त्यांना तुम्ही का संरक्षण देत आहात, अशा शब्दांत सरकारवर ताशेरे ओढले. डॉक्टर नेमण्याबाबत दोन आठवड्यांत ठोस निर्णय घ्या. अन्यथा, अवमान नोटिशीला सामोरे जा, अशी तंबीच न्यायालयाने दिली.