आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Are Thackeray Brothers Come Together ? , Divya Marathi

रणधुमाळी: महायुती तुटल्यानंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुती तुटल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एक होणार असल्याच्या बातमीने शुक्रवारी दिवसभर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.शिवसेनेने मात्र या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेना आणि भाजप यांची २५ वर्षांची युती मोडल्यानंतर पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या दुरावलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चेने उचल खाल्ली. सध्या आजारी असलेल्या राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला होता इथपासून ते मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे रात्री उशिरा उद्धव ठाकरेंना भेटले इथपर्यंत अनेक प्रकारच्या बातम्यांना उधाण आले होते. काही वृत्तवाहिन्यांनी लगोलग हे वृत्त प्रसारित केल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.
मात्र, उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांचे जनसंपर्क प्रमुख असलेल्या हर्षल प्रधान यांनी हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या या खुलाशानंतरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. दोन महिन्यांपूर्वी भय्यू महाराजांनी या दोन्ही बंधूंमध्ये शिष्टाई करण्याचा प्रयत्न केल्याचे दाखले देत सोशल मीडियावरही या बातमीची हवा होती.

बातमी पसरवण्यामागे प्रयोजन काय?
सध्या विविध पक्षांतील राजकीय नेत्यांचा भाजपकडे असणारा कल लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस शिल्लक असताना शिवसेना आणि मनसे या दोन्ही राजकीय पक्षांमधून भाजपकडे होऊ शकणारे आऊटगोइंग थांबवण्यासाठी हेतुपुरस्सर ही बातमी पसरवल्याची प्रतिक्रिया प्रदेश भाजपच्या एका बड्या नेत्याने दिली. तर या बातमीमुळे संभ्रमाचे वातावरण पसरवून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एका शिवसेना नेत्याने दिली.