आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबई विमानतळावर पांढर्या टोप्या आणि हातात झाडू असलेले हजार-बाराशे कार्यकर्ते.. हातात अरविंद केजरीवालांचे फोटो असलेले फलक.. मध्येच एखादी सत्ताधार्यांच्या विरोधातली घोषणा.. नऊवारी साड्या नेसून औक्षण करण्यासाठी तयारीत असलेल्या महिला.. एकूण माहोल पाहता हे कार्यकर्ते जरी ‘आम आदमी पार्टी’चे असले तरी एकूणच स्वागताची तयारी ‘खास’ अशीच होती.. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर अरविंद केजरीवाल यांचे आगमन झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
बुधवारी सकाळी मुंबईत आलेल्या केजरीवाल यांचे मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर अगोदरच तैनात असलेल्या रिक्षात बसून अंधेरी स्टेशनच्या दिशेने रवाना झाले. केजरीवाल बसलेल्या रिक्षाच्या आसपास राहण्याची मोटारसायकलवर स्वार असलेल्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या गराड्यात अंधेरी स्थानकात केजरीवाल पोहोचले.. मीडियाचे पाच पंचवीस कॅमेरे, माध्यमांचे प्रतिनिधी, ‘आप’चे कार्यकर्ते, सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस आणि उत्साही प्रवाशांच्या गोंधळात आणि रेटारेटीत पुढची दहा मिनिटे गेली.. अखेर अंधेरीच्या फलाट क्रमांक तीनवर चर्चगेटला जाणारी गाडी आली आणि केजरीवालांनी गाडीत जनरल बोगीत प्रवेश मिळवला.. त्यांच्या पाठोपाठ ते बसलेल्या डब्यात जाण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींची एकच झुंबड उडाली.. प्रचंड गर्दीमुळे घामाने ओथंबलेले केजरीवाल खिडकीपाशी शांत बसले होते... अधेमध्ये प्रवासादरम्यान मधल्या स्टेशन्सवर गाडी थांबली की आपच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा ते स्वीकार करत होते.
मेटल डिटेक्टर उखडले
अंधेरीहून निघालेली लोकल गाडी अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर चर्चगेट स्थानकात दाखल झाली. गाडीतून आलेले कार्यकर्ते आणि चर्चगेट स्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी दरवाजावर मोठी गर्दी केल्याने गाडीतून बाहेर पडायलाच केजरीवाल यांना पंधरा मिनिटे लागली. त्यानंतर स्टेशनवरून बाहेर पडताना कार्यकर्त्यांच्या गर्दीचा लोंढासुद्धा इतका जबरदस्त होता की, चर्चगेट स्टेशनवरचे मेटल डिटेक्टर उखडले.
देशभक्तिपर गीतांनी भारावले
दक्षिण मुंबई या मीरा सान्याल यांच्या मतदारसंघात केजरीवालांचा रोड शो आयोजित होता. गिरगावच्या नाना चौकातून निघालेली ही पदयात्रा नागपाडा, दोन टाकी, भायखळा या मुस्लिमबहुल भागातून खिलाफत हाऊसकडे रवाना झाली. या भागात रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला.. रस्त्यावरून निघालेल्या या पदयात्रेकडे घराघरातून लोक कुतूहलाने पाहत होते. दिल्लीहून केजरीवाल यांच्यासोबतच आलेल्या शहीद संतोष युवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी देशभक्तिपर गीतांच्या सुरात रोड शोदरम्यान चांगलीच वातावरण निर्मिती केली. रोड शोनंतर केजरीवाल यांनी खिलाफत हाऊसमध्ये भाषण केले. या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर थेट टीका केली. भाषण आटोपल्यानंतर केजरीवाल आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह संध्याकाळच्या रोडशो आणि सभेसाठी ईशान्य मुंबई या मेधा पाटकर यांच्या मतदारसंघाकडे रवाना झाले.
‘आपु’लकीची भाषा अन् अपशब्दांचे वारही
रोड शोमध्ये ठिकठिकाणी केजरीवाल यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अंधेरी आणि चर्चगेट स्टेशनवरही लोक फुटओव्हर ब्रीज आणि फलाटावर उभे होते. सरदार पटेल इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगच्या तिसर्या वर्षाला असलेला मयूर शिंगणे हा विद्यार्थी रोड शोच्या अग्रभागी असलेल्या लेझीम पथकात सामील झाला होता. या पक्षात मनापासून काम करायची इच्छाही त्याने व्यक्त केली. विरारहून पहाटेची लोकल पकडून खास या रोड शोसाठी आलेले पासष्ट वर्षांचे सलाम कुरेशीही ‘आप’बाबत खूपच आशावादी दिसले. सामान्य माणसासाठी हा पक्ष काहीतरी करेल, अशी प्रतिक्रिया रोड शोदरम्यान रस्त्याच्या कडेला उभे राहणार्यांमध्ये ऐकायला मिळाली.
नॉव्हेल्टी सिनेमाच्या चौकात मात्र एक तरुण केजरीवाल यांच्या गाडीवर चढला आणि अपशब्द वापरून केजरीवाल यांच्याशी तावातावाने बोलत होता. कार्यकर्त्यांना त्याला आवरले, तेव्हा काही वेळ तणाव होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.