आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला मोठा झटका, धाकट्याने बरोबरीचा हिस्सा घेतला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल हा प्रचंड उत्सुकतेचा विषय होता. मुंबईत अस्मितेच्या लढाईवर विशेष लक्ष असतानाच इतर ९ मनपा आणि २५ जिल्हा परिषदा म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकच होती. त्यामुळे ताणलेले संबंध आणि ताणलेली उत्सुकता आज महत्वपूर्ण राजकीय बदलांची नांदी करत शमली.
 
मुंबईत शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या तरीही पक्षासाठी हा मोठा झटका आहे. कारण मराठी अस्मितेचा भावनिक मुद्दा त्यांना एकहाती सत्ता देऊ शकला नाही. दुसरीकडे धाकटा भाऊ भाजपने वाटण्यांमध्ये आपला हिस्साच नव्हे तर बरोबरीचा हिस्सा हिसकावून घेतला. गेल्यावेळी फक्त ३६ जागांवर असलेली भाजपा ८१ पर्यंत मजल मारू शकली यातच सर्व आले.
 
मध्य मुंबईत मराठी माणसाने ‘अस्मिते’च्या बाजूने कौल देत सेनेला जवळ केले. मात्र भाजपने पश्चिम आणि पूर्व भागात इतर भाषक आणि मराठी मते मिळवून मोठी मजल मारली. त्यामुळे मराठी माणसाने शिवसेनेला जवळ केले असले तरी भाजपला अगदीच दूर सारले असे म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण लक्ष मुंबईवर केंद्रीत केल्याने राज्यभरात त्यांना नुकसान झाले तर भाजपच्या केडरने आपले काम करत जोरदार मुसंडी मारली.
 
कॉँग्रेससाठी हे निकाल म्हणजे भाजपच्या भाषेत, ‘मुक्त’ होण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. राज्य स्थापनेच्या ५६ वर्षात कधी नव्हे अशी कॉँग्रेसची स्थिती झाली आहे. नगर पालिका, नगर परिषदांबरोबरच आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतही मतदारांनी कॉँग्रेसला ‘हात’
दिलाय. माजी मुख्यमंत्र्यांचे गढ असलेल्या लातूर, सोलापूरमध्येही भाजपचे कमळ फुलले. विदर्भात निर्विवाद असलेल्या भाजपने राष्ट्रवादीच्या अस्मितेलाही हात घालत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपली पावर दाखवली.
 
एकुणच मोदींचा चेहरा न वापरता लढल्या गेलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा आणि  विकासाचा अजेंडा याचा विजय झाला, कॉँग्रेसचा पाय खोलात गेला आणि शिवसेनेला मोठा फटका बसला हा या निवडणुकीचा सार आहे. विशेष म्हणजे बहुचर्चीत नोटबंदीचा मुद्दा भाजप विरोधात बिलकुल चालला नाही.  येत्या काळात भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातचा फॉर्मुला वापरून राज्यात पुन्हा पुन्हा सत्तेत येण्यासाठी रणनीती आखली तर नवल वाटणार नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...