आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलक्षण - इलक्शन: तुमचा गेरू.. तुमचाच चुना.. !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेच्या एका मतदारसंघात निवडणुकीला किती खर्च येतो याचे आकडे अधिकृत काही लाखांपासून अनधिकृत काही कोटींच्या पर्यंत सांगितले जात आहेत. निवडणुका म्हणजे पैसा पाण्यासारखा खर्च करण्याची गोष्ट झाली आहे. लातूर मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार बसवंत उबाळे यांच्यासह ‘आप’चे कर्नल गडकरी व प्रतिभा शिंदे या उमेदवारांनीही खर्च परवडत नाही असे म्हणत या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र पूर्वी अमरावती लोकसभा मतदारसंघात निव्वळ मतदारसंपर्क आणि तळमळीने काम करणारा एक कार्यकर्ता काहीही खर्च न करता विजयी झाला होता, असे सांगितले तर खोटे वाटेल. 19८९ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉ. सुदामकाका देशमुख हे अमरावतीतून विजयी झाले. त्यावेळी लोकांनीच पदरमोड करून सुदामकाकांचा प्रचार केला होता. एवढे कशाला त्यावेळी प्रचारासाठी भिंती रंगविताना लोकांनी रंगवले होते -
‘तुमचा गेरू, तुमचाच चुना, सुदाम काकांना निवडून आणा’
मतदारांना ही घोषणा भावली आणि त्यांनी सुदामकाकांना लोकसभेत पाठविले !
० दिलीप धारूरकर, औरंगाबाद


मनसेची प्रेमपत्रे
‘मराठी बाणा’चे भांडवल करत स्थापन झालेल्या मनसेचे दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार आदित्य शिरोडकर यांनी या लोकसभा मतदारसंघातील 1 लाख 25 हजार नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी भावनिक साद घालणारी प्रेमपत्रे पाठवली आहेत. इंग्रजी -मराठी भाषेत असलेल्या या पत्रातील मजकूर नमुनेदार आहे. अत्यंत आकर्षक अशा चार पानांच्या या ग्रीटिंग्जच्या कव्हरवर ‘युवर फ्युचर@युवर फ्रेन्डशीप’ अशी साद आहे. ‘ही संधी आहे चुका दुरुस्त करण्याची, देशाची नव्याने बांधणी करण्याची, देशात नवा जोश निर्माण करण्याची आणि त्यासाठी उच्चशिक्षित, विश्वासार्ह, व्हिजनरी आणि त्यासाठी मत देण्याची,’ अशी साद या पत्रात घातलेली आहे. ‘हाय, आपण दोघेही आयुष्याच्या पहिल्या गोष्टीवर प्रेम करतो, बरोबर ना ? पहिला इंटरव्ह्यू, पहिली कमाई, पहिली बाईक, पहिले अवॉर्ड, पहिलं प्रेमपत्र,
ती पहिली भेट. असल्या अनेक पहिल्या गोष्टींनी जगण्याला दिलं एक नवं वळण! आणि आता येते आहे एक अजोड पहिली संधी आपल्या आयुष्यात 16व्या लोकसभेसाठी मत देण्याची पहिली गे्रट संधी !’ असा उल्लेखही या प्रेमपत्रात आहे.० अशोक अडसूळ, मुंबई