आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदू होनप : श्रद्धा आणि प्रतिभेचा संगम असणारा अवलिया कलावंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध गायक अजित कडकडे आणि संगीतकार नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. त्यांच्या साथीला होते गीतकार प्रवीण दवणे. राजा परांजपे, ग.दि. माडगूळकर व सुधीर फडके या त्रिमूर्तीने तीन दशके जसा मराठी चित्रपट, संगीताचा प्रांत गाजवला, तशीच कामगिरी होनप- कडकडे- दवणे या तिघांनी एेंशीच्या दशकापासून केली. या त्रिमूर्तीमधील एक पान होनप यांचे निधन झाले. कडकडे यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना कडकडे यांच्याच शब्दांत...
‘मी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा शिष्य. नाट्यगायनाकडे माझा जास्त कल होता. गोव्यावरून मुंबईत आल्यानंतर माझी गाठ पडली ती संगीतकार नंदू होनप यांच्याशी. माझ्याप्रमाणे तेसुद्धा संगीत क्षेत्रात जम बसवत होते. संगीत शिक्षक असणारे होनप यांनी एका कार्यक्रमात माझे गाणे एेकले आणि ‘अजित, मी भक्तिगीतांवर एक कॅसेट करताेय, माझ्याकडे तू गायचे आहे’, असे सांगितले. मी हो म्हटले आणि आमचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात आणखी एक साथी आम्हाला मिळाला तो म्हणजे गीतकार प्रवीण दवणे. सर्व देवी, देवता, संत, महात्मे यांच्यावर साडेतीन दशकांत आम्ही खूप काम केले आणि त्यामधून हजारो गाणी तयारी झाली.

‘दत्ताची पालखी’ हे गाणे दवणेंनी साध्या-सोप्या शब्दांत बांधलेले. माझा एकही कार्यक्रम या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ‘दत्ताची पालखी’ या कॅसेटमध्ये मी व अनुराधा पौडवाल यांनी प्रत्येकी चार गाणी गायिली. ही कॅसेट लाखांच्या संख्येने खपली. होनप यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाण्यांचे ऊटलाइन तयार करून पुढे गायकांना मोकळे सोडायचे. ताना, आलाप घेण्याची पूर्ण मुभा त्यांनी आम्हाला दिली. गायकांवरील प्रचंड विश्वासामुळे मी, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, वैशाली सामंत असे सर्वजण होनपांसाठी तनमन लावून गायचो. विशेष म्हणजे त्या वेळी रेकॉर्डिंग लाइव्ह असायचे. संगीतकारांची टीम, कोरस असे सर्व मिळून गाणे रेकाॅर्ड व्हायचे आणि एका टेकमध्ये ८ ते १० मिनिटांचे हे गाणे उत्तमपणे गाण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर असायची आणि ती आम्ही होनपांमुळे समर्थपणे सांभाळू शकलो.

स्वामी समर्थांवर होनप यांची प्रचंड श्रद्धा. दरराेज ते दादरच्या मठात न चुकता जायचे. मला वाटते होनपांवरही समर्थांची कृपा होती. दत्तगुरू आणि समर्थांवरच्या गाण्यांना त्यांना सुचलेल्या अजरामर चाली या कृपेमधून आल्या होत्या, असे ते नेहमी सांगत. मी निमित्तमात्र आहे, असे ते सांगून कुठलेच श्रेय घ्यायला तयार नसत. माझ्यावर होनपांचे विशेष प्रेम असल्याची गाेड तक्रार इतर गायक त्यांच्याकडे करत. पण आपल्या चाली अजित चांगला गाऊ शकतो, असा त्यांना विश्वास होता आणि त्याला मी कधीही तडा जाऊ दिला नाही. फक्त भक्तिसंगीतच नाही तर लोकसंगीतापासून संगीतामधील सर्व प्रकारांचा साज त्यांनी गाण्यांना दिला. विशेष म्हणजे, गुरू अभिषेकी बुवांकडूनही त्यांनी दोन कॅसेटसाठी गाणी गाऊन घेतली. आशा भोसले, उषा मंगेशकरही त्यांच्यासोबत गायिल्या. बऱ्याच नवोदित कलाकारांनाही त्यांनी संधी दिली.
दत्ताची पालखीसोबत जीवनयात्रा संपली
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरातील कार्यक्रमात शनिवारी त्यांनी आधी चार गाण्यांसाठी व्हायोलिन वाजवले होते. त्या वेळी त्यांना काही त्रास असेल असे कोणालाच वाटले नाही. पण मैफलीचा समारोप करताना त्यांनी वाजवलेल्या दत्ताची पालखी या गाण्याबरोबर त्यांची जीवनयात्रा संपवावी, याला काय म्हणावे? कदाचित दत्तगुरू व स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असतानाच आपली इहलोकाची यात्री संपवावी, असे त्यांना कुठेतरी वाटत तर नसावे... असे वाटून जाते. आता ते आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाही.
(शब्दांकन : संजय परब)
बातम्या आणखी आहेत...