आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुभत्या गायीच्या लाथा गोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप-शिवसेनेच्या राज्यात नितीन गडकरी यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘न भूतो’ अशा गतीने काम करून दाखवले. या कार्यक्षमतेचे कौतुक अगदी अजित पवारांनाही आहे आणि राज ठाकरे यांनाही. या दोघांशीही गडकरी यांची वैयक्तिक मैत्री आहे. गडकरींबद्दलचे प्रेम राज यांच्याकडूनही अनेकदा व्यक्त झालेय. महाराष्‍ट्राचाचा मुख्यमंत्री कोण असावा, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी नि:संकोचपणे गडकरींचे नाव घेतले होते. विशेष म्हणजे मनसेची स्थापना झाल्यानंतरच्या मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिले होते. पूर्ती उद्योगसमूहातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नितीन गडकरी यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून नुकतेच पायउतार व्हावे लागले. या वेळीही राज यांनी गडकरींची पाठराखण केली. ‘दिल्लीत मराठी माणसाचा द्वेष केला जातो. गडकरींवरच्या आरोपांमध्ये तथ्य नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

नव्वदच्या दशकात महाराष्ट्र भाजप सर्वार्थाने प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे जोडगोळीच्या हातात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मर्र्जी राखत, जिंकत महाजन-मुंडे यांनी 95 मध्ये युतीचा भगवा विधानसभेवर फडकवला. त्या काळात राज ठाकरे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारणाचे धडे गिरवत होते. 1996 मध्ये पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रमेश किणी या मुंबईकराचा मृतदेह सापडला. राज ठाकरेंच्या इशाºयावरून किणींचा खून झाल्याचे आरोप त्या वेळी झाले. किणी खून प्रकरणाचे भूत ठाकरेंच्या मानगुटीवर बसले तेव्हा राज्याच्या गृहखात्याची सूत्रे मुंडे यांच्याकडे होती. बाळासाहेबांच्या पुतण्याला किणी खुनाच्या किटाळातून सोडवण्यासाठी मुंडे यांनी मदत केली होती. याची आठवण असल्याने बहुधा मुंडे यांच्यावर बरसणारे राज महाराने पाहिलेले नाहीत.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या इंजिनाने मुंबई-ठाणे पट्ट्यात जोरदार मुसंडी मारत लक्षणीय मते मिळवली. भाजप-सेना युती आणि मनसे परस्परांच्या विरोधात लढत राहिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून हटवणे अवघड होईल, याचा साक्षात्कार या निवडणुकीने भाजपला झाला. त्यामुळेच मनसेला सोबत घेण्याची भाषा 2009 नंतर भाजपकडून सातत्याने होऊ लागली. अडीच दशकांहून अधिक काळाची मैत्री असलेल्या शिवसेनेची नाराजी पत्करूनही मनसेशी सलगी राखण्याचा प्रयत्न भाजपने नेहमीच आणि उघडपणे केला. राज यांनीही मुंडे आणि गडकरी या दोघांनाही कधी ‘टार्गेट’ केलेले नाही. सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या राज ठाकरेंच्या विक्रमी सभांमध्येही भाजपला झोडपलेले नाही.

भाजप आणि मनसे यांच्यातील संबंधांना अशी सौहादर्पूर्ण पार्श्वभूमी असताना अचानकपणे राज यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर ‘सेटलमेंट’चा आरोप केला. नियोजित विदर्भ दौ-यावर जाण्यापूर्र्वी राज यांच्याकडून झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळे भाजप हडबडला. बाळासाहेब ठाकरे राग आला की भाजपला नेहमीच ‘आमची कमळाबाई’ असे खिजवायचे. परंतु राज ठाकरे यांनी थेट भाजपच्या राजकीय प्रामाणिकतेबद्दलच संशय व्यक्त केला. या टोकाच्या टीकेनंतरही मुंडे-गडकरी यांनी नेमस्तपणाची भूमिका घेतली. राज आणि खडसेंनी आपसात वाद वाढवू नये, असे आवाहन मुंडे यांनी केले. गडकरी यांनी कृष्णकुंजचे उंबरे झिजवले. राज ठाकरे यांनी खोडी काढल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात न पडता भाजपने सपशेल माघार घेतली.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरच्या शिवसेनेचे भवितव्य ठरवणारी पहिलीच निवडणूक 2014 मध्ये होत आहे. शिवसेनेवर किती अवलंबून राहायचे याचा अंदाज लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपला बांधता येईल. नव्या समीकरणांची जुळवाजुळव करताना भाजपपुढचा पहिला पर्याय मनसे हाच असणार आहे. स्वबळावर सत्ता मिळवण्याची भाषा करणारे राज ठाकरे 2014 मधले ‘किंगमेकर’ होऊ शकतात, असे वातावरण त्यांच्या सध्याच्या विक्रमी सभांनी निर्माण केले आहे. महाराची सूत्रे मुंडे यांच्याकडे दिल्यानंतरही भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. हा अध्यक्ष मुंडे यांच्या पसंतीचा की गडकरी यांच्या मनातला यावरून घोडे अडले आहे. राष्ट्रीय राजकारणातील स्थान अनिश्चित असल्याने गडकरी अस्वस्थ आहेत. राज्याच्या राजकारणात भाजप कुठे असेल याची शाश्वती मुंडे यांना नाही. दोघेही अस्वस्थ. त्यामुळेच राज यांना अंगावर न घेता त्यांच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न दोघांनी त्वरेने केला. महाराची सत्ता भाजप एकहाती काबीज करू शकत नसल्याचे वास्तव प्रमोद महाजन यांनी ओळखले होते. मुंडे-गडकरी यांनाही ते मान्यच आहे. भविष्यात बेरजा कराव्या लागल्या तर राज यांच्याशी अधिक जवळीक असलेल्या गटाचेच पारडे भाजपमध्येही जड असेल, याची जाणीव दोघांना आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेत्याच्या चारित्र्यावर जाहीरपणे शिंतोडे उडवल्यानंतरही भाजप मिठाची गुळणी धरून बसला. मनसेची गाय दूध देईल या आशेने खाल्लेली ही लाथ किती गोड लागते, हे काळच ठरवेल.