आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artist Doesn't Run To Political Parties Sanjay Devtale

कलाकारांनी राजकीय पक्षांकडे धाव घेऊ नये! , सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी चित्रपट कलाकारांना आकर्षित करून राजकीय पक्षाचे सदस्य करून घेण्यासाठी गेले काही दिवस शिवसेना आणि मनसेमध्ये लागलेल्या स्पर्धेला सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले. मराठी चित्रपटांत काम करण्यासाठी कलावंतांना किंवा तंत्रज्ञांना कोणत्याही राजकीय संघटनेचे सदस्य असणे अनिवार्य नसून त्यांना एखाद्या संघटनेकडून अटकाव होत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराच संजय देवतळे यांनी दिला आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कलाकारांनी ‘कृष्णकुंज’ किंवा ‘मातोश्री’वर जायची काहीही गरज नसल्याचा टोला आपल्या एका भाषणात लगावला होता.


मराठीच्या मुद्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना व मनसेमध्ये स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे लोकप्रिय असलेल्या मराठी कलाकारांना आपल्या संघटनेमध्ये आणून वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांमधून गेले काही दिवस होत आहे. त्याचवेळी संबंधित पक्षांचे सदस्य झाल्यासच त्यांचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले जाते. अशावेळी कलाकारांनी मनसे, शिवसेनेसारख्या राजकीय पक्षांकडे न जाता थेट राज्य सरकारकडेच जावे म्हणून काँग्रेसने ही खेळी खेळली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यंमत्री देवतळे यांची भेट घेऊन मराठी चित्रपटांशी संबंधित अनेक समस्यांबाबत त्यांना माहिती दिली. मराठी चित्रपटांविषयक समस्या सोडविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कलावंत, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांशी नियमित संवाद साधणारी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना माणिकराव ठाकरे यांनी या वेळी केली. मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहाची उपलब्धता, मराठी चित्रपट निर्मितीसाठी मिळणारे अनुदान आदी विषयांसह इतरही अनेक प्रश्नांबाबत यावेळी चर्चा झाली. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देवतळे यांनी दिले.


राजकीय पक्षातील चित्रपट कलावंत
मनसे चित्रपट सेना : महेश मांजरेकर,रसिका जोशी, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, पुष्कर क्षोत्री, रिमा लागू
शिवसेना चित्रपट सेना : आदेश बांदेकर (अध्यक्ष), आदेश बांदेकर, सुबोध भावे, शरद पोंक्षे, दिगांबर नाईक, मृणाल कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर