आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागवल्या अरुणाच्या स्मृती; परिचारिकांसाठी पाच लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली ४२ वर्षे ‘केईएम’मध्ये अंथरुणाला खिळून राहिलेल्या अरुणा शानबागला नुकतीच मुक्ती मिळाली. मात्र तिच्या पश्चातही वाढदिवस साजरा करून परिचारिकांनी साेमवारी अरुणाच्या अाठवणी जागवल्या. (छाया : संदीप महाकाल) - Divya Marathi
गेली ४२ वर्षे ‘केईएम’मध्ये अंथरुणाला खिळून राहिलेल्या अरुणा शानबागला नुकतीच मुक्ती मिळाली. मात्र तिच्या पश्चातही वाढदिवस साजरा करून परिचारिकांनी साेमवारी अरुणाच्या अाठवणी जागवल्या. (छाया : संदीप महाकाल)
मुंबई - एक जून... मृत्यूशी तब्बल ४२ वर्षे झुंज देणारी परिचारिका अरुणा शानबागचा वाढदिवस... अाज अरुणा हयात नाही, तरीही केईएमची वाॅर्ड क्रमांक ४ ची साइड रूम सोमवारी दरवर्षीप्रमाणे सजवली हाेती... ! तिच्या बेडवर अरुणाला आवडणारी सोनचाफ्याची फुले पसरवली गेली. रंगीत पडदे नव्याने लावले होते. हवेच्या झुळकीबरोबर ते मंदगतीने हलत होते. जणू अरुणा या जगात असल्याची साक्षच ‘केईएम’मधील हे वातावरण देत हाेते. चार दशके अरुणाची सेवा करणाऱ्या १२०० नर्सेसपैकी काहींनी आज अावर्जून या खोलीला भेट दिली. तिच्या आठवणी जागवल्या.

निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांना सलाम करण्यासाठी शिवसेना अामदार नीलम गाे-हे याही ‘केईएम’मध्ये अाल्या हाेत्या. त्यांनी केईएमच्या नर्सेस हाेस्टेलसाठी पाच लाखांचा निधी दिला! केईएममधील परिचारिकांच्या हाेस्टेलमध्ये वाचनालय, जिम्नॅशियम, सांस्कृितक केंद्र उभारावे यासाठी गो-हे यांनी ही मदत केली आहे. या वेळी डाॅ. अविनाश सुपे, अरुणाच्या नर्स शिक्षिका दुर्गा मेहता, अरुणाची गोष्ट या नाटकात काम करणाऱ्या चिन्मयी राघवन, चंपा मावशी यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला....

लख्ख चेहरा दिसताेय
अरुणाला दयामरण देण्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय परिचारिकांनी घेतला हाेता, अशा अाठवणी अनुराधा पराडे यांनी जागवल्या. ‘अरुणा जिवंत आहे अाणि तिला कोणालाही मारण्याचा हक्क नाही हे आमचे म्हणणे कोर्टानेही मान्य केल्यानंतर आम्ही अरुणाचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली. १ जूनला आम्ही अरुणाच्या रूमचे पडदे तर बदलतोच, पण खाेली फुलांनी सजवतो. तिला चाफ्याची फुले खूप आवडायची. मासे व आमरसही भरवायचो. मासे खाल्ल्यानंतरचा अरुणाचा फुललेला चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर लख्ख उभा आहे,’ असे पराडेंसह इतर नर्सेसनी सांगितले.

नर्सेसना सलाम : सुपे
अरुणाची काहीच चूक नव्हती. असेल तर ती तिच्या प्रामाणिकपणाची होती. पण म्हणून इतरांनी प्रामाणिकपणा सोडून कसे चालेल? अरुणाची रूम स्मृतिकेंद्र करण्याविषयी चर्चा करून िनर्णय घेऊ, असे सांगत अधिष्ठाता डाॅ. अिवनाश सुपे यांनी अरुणाची सेवा करणाऱ्या १२०० नर्सेसना सलाम केला.

अरुणा जिवंत : चिन्मयी
‘अरुणाची गोष्ट’ या नाटकात अरुणाची भूमिका करणाऱ्या चिन्मयी सुर्वे म्हणाल्या, ‘माझी कला जगताला ओळख झाली ती अरुणाच्या भूमिकेमुळे. ती गेल्याने माझा एक अंश संपला आहे, पण माझा शेवटचा श्वास सुरू असेपर्यंत अरुणा जिवंत असेल...’ अशा भावुक भावना चिन्मयी सुर्वे यांनी व्यक्त केल्या.

दोषीला शिक्षा व्हावीच
अरुणावर अत्याचार करणारा सोहनलाल अाजही जिवंत आहे. त्या वेळी काही त्रुटी राहिल्याने सोहनलालला कमी शिक्षा झाली असेल, मात्र आता कायदेतज्ज्ञांचे मत घेऊन सोहनलालला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून िनवेदन देणार असल्याचे अामदार गाे-हे म्हणाल्या.