आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवानगी सभा: अरविंद केजरीवाल यांना 10 हजार रुपयांचा जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबईतील कुर्ला येथील महानगर दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी दहा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कुर्ला न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा मिळावी, अशी विनंती केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र ती फेटाळल्यानंतर बुधवारी अखेर केजरीवाल न्यायालयासमोर हजर झाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीच्या उमेदवार मेधा पाटकर यांचा प्रचार करताना केजरीवाल यांनी पोलिसांची परवानगी न घेता मानखुर्द गोवंडी या परिसरात राजकीय सभा घेतली होती. त्या विरोधात महानगर दंडाधिकारी ऋचा खेडेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी केजरीवाल यांच्यासह मेधा पाटकर आणि मुंबईतील आणखी एक उमेदवार मीरा सन्याल या देखील सहआरोपी असून त्यांना यापूर्वीच संबंधित न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान केजरीवाल हे उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात आले होते. या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवाल यांनी या खटल्यादरम्यान गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. बुधवारी केजरीवाल यांच्या जामिनासाठी आम आदमी पक्षाचे नेते सतीश जैन यांनी हमीपत्र दिले, त्यावरून जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या पुढच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात गैरहजर राहण्याची केजरीवाल यांनी केलेली विनंतीही न्यायालयाने मान्य केली. दरम्यान, केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला न्यायालयासमोर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या वेळी कार्यकर्त्यांच्या हातात केजरीवाल यांच्या समर्थनाचे फलक होते. न्यायालयातील कामकाज आटोपून केजरीवाल हे पक्षाच्या बैठकीसाठी रवाना झाले.