आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, Broom, Maharashtra, Lok Sabha Election

केजरीवालांचा ‘झाडू’ महाराष्‍ट्रात चालणार? खाते उघडण्याची पक्षाला आशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवत जन्माला आलेल्या व अल्पावधीसाठी का होईना दिल्लीची सत्ता मिळवलेला आम आदमी पक्ष आता लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. महाराष्‍ट्रातील लोकसभेच्या 40 जागा हा पक्ष लढवणार असून त्यापैकी 16 उमेदवार जाहीरही केलेत. कॉँग्रेस-राष्‍ट्रवादी व भाजप या दोघांशीही एकाच वेळी पंगा घेतलेला हा पक्ष आता या निवडणुकीत कितपत प्रभाव टाकू शकेल, यावरच त्याचे भवितव्य ठरणार आहे.


देशात किमान 100 जागांवर ‘आप’चा प्रभाव राहील, असे सर्व्हेक्षण सांगते आहे. ईशान्य मुंबईमधून मेधा पाटकर आणि चंद्रपूरमधील वामनराव चटप या ‘आप’च्या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र, राज्यातील ‘आप’चे इतर उमेदवार प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत बलाढ्य वाटत नाहीत.


2004 च्या निवडणुकीत ‘एनडीए’ला 42% मतांसह 25 जागा मिळाल्या, तर 2009 मध्ये 35% मतांसह 20 जागा मिळाल्या. 2009 मध्ये ‘एनडीए’ला ‘मनसे’चा मोठा फटका बसला. या वेळी राज्यातून ‘एनडीए’ला 34 जागांची अपेक्षा आहे. परंतु, या वेळी ‘एनडीए’च्या अश्वमेधाचा घोडा ‘आप‘ रोखण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. ‘आप’चा सर्वाधिक फटका भाजपप्रणीत आघाडीला बसणार आहे. कारण, नरेंद्र मोदी यांची खरी क्रेझ शहरी मतदारांत आहे. पण, याच मध्यमवर्गाचं भ्रष्टाचार हे दुसरे दुखणं आहे. त्यालाच हात घातल्याने शहरी मतदार आम आदमी पक्षाशी जोडला जात असल्याचे दिसत आहे.


सिने तारे-तारका प्रचारक
स्टार कँपेनची ‘आप’ने जय्यत तयारी केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकणी, नंदू माधव, नाटककार रत्नाकर मतकरी, सदाशिव अमरापूरकर, संदीप कुलकर्णी आदी ग्लॅमर असणारी मंडळी ‘आप’च्या स्टार कँपेन टीममध्ये असणार आहेत.
‘आप’ कुठेही बॅनर लावणार नाही की नेत्यांचे कटआऊट टांगणार नाही. नुक्कड बहस (जनसुनवाई) आणि सोशल नेटर्वकिंग हे ‘आप’च्या प्रचारातील मोठे बलस्थान असेल. ‘आप’कडे पगारी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. तसेच हजारो नोकरदार मंडळी दोन महिने रजा टाकून ‘आप’चा प्रचार करणार आहेत. युवकांना जोडण्यासाठी प्रचारात संगीताचा मोठा वापर असेल. अशी सभा नुकतीच अंधेरीत झाली. त्याला तुफान प्रतिसाद लाभला.


2009 च्या निवडणुकांमध्ये ‘मनसे’ने ‘एनडीए’ची गोची केली. जवळजवळ 10 जागा ‘एनडीए’ला हातच्या गमवाव्या लागल्या. पण, एवढी उपद्रव क्षमता असूनही ‘मनसे’ला मात्र खातेही उघडता आले नाही. या वेळी ‘आप’ने ‘मनसे’ची जागा जरूर पटकावली आहे. मात्र, ‘आप’ राज्यात खाते तर उघडेलच, पण पाच ते सात जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘आप’ची तिकीट वाटपाची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नाराजही झाले आहेत. तसेच समाजवाद्यांमधील जुन्या शत्रुत्वाचा फटका तिकीट निश्चितीस बसला आहे. दोन्ही जाहीर याद्यांमध्ये मेधा पाटकर आणि वामनराव चटप वगळता मातब्बर असे कोणीही नाहीत.


पक्षाच्या काही चुका
माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील आणि माजी न्या. पी. बी. सावंत यांनी नुकतीच लोकशासन पार्टीची घोषणा केली. या दोघा बुजुर्ग आंदोलक-नेत्यांना ‘आप’ सामावून घेऊ शकली नाही. पुण्यातील डीएस कुलकर्णींना उमेदवारी नाकारून ‘आप’ने हातची सीट गमावली. प्रकाश आंबेडकर यांचा युतीचा प्रस्ताव अस्तित्वात येण्याची शक्यता कमीच दिसते. अशा अनेक चुका राज्यातील ‘आप’ने केल्या आहेत.


मराठी चेह-याचा अभाव
‘आप’कडे पैसे, व्यवस्थापक आहेत, विचार आहेत, तंत्रज्ञ आहेत, प्रचाराची ब्ल्यू प्रिंटही तयार आहे. नाहीय तो केवळ मराठी चेहरा. अंजली दमानिया आणि मयंक गांधी यांच्या जीवावर राज्यातील लोकसभा निवडणुकांचा रथ नदीपार कदापि होऊ शकणार नाही. पण, हेच दिल्लीतील ‘आप’ नेतृत्वाला उमगलेले नाही.


पवार, भुजबळ, गडकरींशी पंगा
राष्‍ट्रवादीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची घोषणा करणारे ‘आप’चे नेते यांनी अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या राष्‍ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याविरोधातही आरोपांचा धुरळा उडवला. इतकेच नव्हे, तर गडकरींविरोधात नागपूरमधून खुद्द दमानिया यांनी उमेदवारी दाखल करून त्यांना खुले आव्हान दिले आहे.


सोशल नेटवर्किंवर भर
राज्यातील 20 लाख मतदारांची ‘आप’कडे नोंदणी. जेथे अधिक सदस्य नोंदणी तेथे अधिक जनाधार. उमेदवार उभे करण्याचेही ‘आप’चे हेच सूत्र आहे. प्रत्येक मतदारसंघात चारसदस्यीय टीम असेल. एक आयटी तज्ज्ञ, एक निष्णात वकील, एक सोशल नेटवर्किंग तज्ज्ञ आणि एक ज्येष्ठ कार्यकर्ता असेल. प्रत्येक मतदारसंघात ‘आप’चे कॉल सेंटर असेल, येथून मतदारांशी मोबाइल फोन, मेल, फेसबुक, ट्विटरवर संपर्क साधला जाईल.


प्रचाराची चतु:सूत्री
‘आप’चे प्रचारतंत्र ‘एनजीओ’च्या पठडीतील आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते यशस्वी ठरले. ते आता देशपातळीवर हाच फॉर्म्युला वापरणार आहेत. यामध्ये चार मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे घरोघरी प्रचार करणे, दुसरे म्हणजे बझ (संगीतमय प्रचार), तिसरे म्हणजे फोनचा वापर आणि चौथे म्हणजे जनसुनवाई.


अण्णांचा पाठिंबा नाहीच
जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनातून ‘आप’चा जन्म झाला. अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या या पक्षाला अण्णांनी नंतर फारसे महत्त्व दिले नाही. महाराष्‍ट्रात अण्णांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांचा ‘आप’ला पाठिंबा मिळेल, असा होरा या पक्षाचे नेते केजरीवाल व इतरांना होता. मात्र, सावध भूमिका घेत अण्णांनी अद्याप तरी तशी भूमिका घेतलेली नाही. त्याचाही फटका या नव्या पक्षाला सहन करावा लागेल.